लाेकमत न्यूज नेटवर्कसाकोली : ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे व पाणीपुरवठा योजनेअंतर्गत थकीत व चालू वीज देयके शासनाने महावितरणला भरावे या मागणीला घेऊन साकोली, लाखनी तालुक्यांतील सरपंचांनी रविवारी आमदार नाना पटोले यांच्या निवासस्थानी ठिय्या दिला. यात दोन्ही तालुक्यांतील ग्रामपंचायत गावांतील खंडित असलेला पथदिव्यांचा वीज पुरवठा जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत सरपंच संघटना मागे हटणार नाही, असा पवित्रा घेतला. वृत्त लिहीपर्यंत सरपंच ठाण मांडून होते. यावेळी आ. पटोले यांनी सरपंचांशी चर्चा केली.शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीने पथदिवे व पाणीपुरवठा योजनेचा चालू वीज भरणा स्वनिधीतून महावितरणला करावा, असा आदेश काढला. अगोदरच कोरोना काळात ग्रामीण भागांतही आर्थिक संकटाचा सामना करीत आलेले शेतकरी व सामान्यांचे कंबरडे मोडले. या परिस्थितीत ग्रामपंचायत तारेवरील कसरत करूनही ही देयके भरण्यास असमर्थ असतानाच महावितरणने दोन्ही तालुक्यांतील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला. पावसाळ्यात दोन्ही तालुक्यांतील ग्रामपंचायतींतील संपूर्ण गावे अंधकारमय होऊन गुन्हेगारीला थारा मिळेल अशा प्रकरणांची सुरुवात झाली आहे. रात्रीबेरात्री विषारी सरपटणारे प्राणी, जंगली हिंस्र पशू अंधारात गावात येण्याची दाट भीती ओढावली आहे.यावेळी साकोली तालुका सरपंच संघटना अध्यक्ष पवनकुमार शेंडे, नयना चांदेवार, शालिक खर्डेकर, प्रेमकुमार गहाणे, लाखनी सरपंच संघटना अध्यक्ष म. वा. बोळणे, प्रशांत मासुरकर, संगीता घोनमोडे, केशव बडोले, कल्पना सेलोकर, सुधाकर हटवार, हरीश लांडगे, पुरुषोत्तम रूखमोडे, प्रल्हाद शेंदरे, मोहन लंजे, चतुर्भुज भानारकर, रवींद्र खंडाळकर, देवेंद्र लांजेवार, भूमिता तिडके, उषा डोंगरवार, माधुरी कटरे, चंदा कांबळे, सुनीता हटवार, रविता मेंढे, आशा लाडे, लीलाधर सोनवाने, मुकेश कापगते, राजकुमार कापगते, खेमेश्वरी टेंभरे, वनमाला सिंदीमेश्राम, सरिता राऊत, अनुसया कोकोडे आदी सरपंच उपस्थित होते.
सरपंच संघटना अडून - शासन यापूर्वी पथदिव्यांच्या वीज देयक भरण्याकरिता शंभर टक्के अनुदान मंजूर करीत होते. आताही शासन स्तरावर पूर्ण अनुदान मंजूर करावे या मागणीला घेऊन साकोली व लाखनी तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायत हद्दीतील सरपंचांनी आ. नाना पटोले यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडला व निवेदन सादर केले. आ. पटोले यांनी यावर दूरध्वनीवर संबंधितांशी चर्चा करून ग्रामपंचायत हद्दीतील गावातवीजपुरवठा सुरू करण्यासाठी निर्देश दिले. जोपर्यंत पथदिव्यांना वीज देत नाही, यावर सरपंच संघटना अडून आहेत.