लाखांदूर : शासनाच्या आधारभूत किंमत योजनेनुसार आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत सातबाराची नोंदणी करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. हे निर्देश गत ७ सप्टेंबर रोजी जिल्हा पणन कार्यालयांतर्गत देण्यात आले आहेत.
यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांद्वारा लागवडीखालील धान पिकाची शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत खरेदी प्रक्रियापूर्व तयारीसाठी शासनाद्वारे सातबारा नोंदणीचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशानुसार आधारभूत धान खरेदी केंद्र चालक सहकारी संस्थांना धान खरेदीकरिता आवश्यक गोदाम सुविधेसह अन्य माहिती तात्काळ पणन विभागाला देणे आवश्यक केले आहे. तथापि, धान खरेदी केंद्र चालक संस्थांतर्गत शेतकऱ्यांद्वारा उपलब्ध करण्यात आलेल्या वेबपोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
दरम्यान, नोंदणी केलेल्या सातबाराअंतर्गत संस्थांना शेतकऱ्यांचे धान खरेदी बंधनकारक करण्यात आले आहे. तथापि, शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाचे चुकारे शेतकऱ्यांना अदा होण्याकरिता संबंधित शेतकऱ्यांचे बँक खाते अद्ययावत असल्याची खात्री संस्थेला करावयाची आहे. त्याकरिता नोंदणीदरम्यान संस्थेअंतर्गत शेतकऱ्यांचे बँक खात्यांची पडताळणी करणे बंधनकारक केले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना धान खरेदी प्रक्रियेदरम्यान अडीअडचणी निर्माण झाल्यास संबंधित संस्थेला जबाबदार धरले जाणार असल्याची ताकीद दिली आहे. यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मूल्य योजनेनुसार आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत शेतकऱ्यांच्या धान खरेदीसाठी पुढील ३० सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या सातबाराची neml या वेबपोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केंद्र चालक संस्थांना केले आहे.