मीरा भट : बेटी बचाओ, बेटी पढाओ संकल्प उत्सव, १,८५० मुलींची उपस्थितीतुमसर : मुलीत मोठी शक्ती असते, निसर्गाचे त्या एक वरदान आहेत. मुलींना वाचवा, त्यांना शिकवा, मुली कुटुंबाचा अभिमान आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मीरा भट यांनी स्थानिक लोकमान्य टिळक राष्ट्रीय शाळेत आयोजित बेटी बचाओ, बेटी पढाओ संकल्प कार्यक्रमात व्यक्त केले.या कार्यक्रमात तुमसर तालुक्यातील ७१ शाळेतील इयत्ता ८ वीच्या १,८५० मुली, त्यांचे पालक, मुख्याध्यापक तथा शिक्षक उपस्थित होते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत लोकजागृती या कार्यक्रमाची जनजागृती करण्याकरिता संकल्प उत्सवाचे आयोजन करण्यात आले. देशातील १०० जिल्ह्यापैकी भंडारा जिल्हा हा मुलींचा जन्मदर कमी असणारा एक जिल्हा आहे. स्त्री भ्रृणहत्या रोखण्याकरिता समता मुलक विचार समाजात पोहोचविण्यासाठी कुटूंबात मुलगा-मुलगी समान आहे. मुलगी सुद्धा मानव आहे. हे विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रम एकूण चार टप्प्यात घेण्यात आला. स्व. निर्धनराव वाघाये पाटील डी.एड. कॉलेज खापा, भारती कन्या विद्यालय तुमसर, जि.प. पूर्व माध्यमिक शाळा डोंगरला येथील मुलींनी स्त्री भृ्रणहत्या व उच्च शिक्षणावर पथनाट्य व नाटीका सादर केली. अतिथी सामाजिक कार्यकर्त्या मीरा भट, पोलीस निरीक्षक आर. आर. नागरे, पोलीस उपनिरीक्षक रमेश झायले, गटाळ, कुरूडकर, मेश्राम यांनी मुलींची सुरक्षा, तथा कायद्याची माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. शांतीदा लुंगे, रश्मी रहांगडाले, नाईक, रिता लोखंडे यांनी किशोरवयीन मुलींचे आरोग्य व आहार, तरूणवयात मुलींच्या शरीरात होणारे बदल आदी विषयी माहिती दिली. यावेळी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात मातोश्री विद्यालय प्रथम, जनता विद्यालय द्वितीय, शिरीनभाई नेत्रावाला विद्यालय मानेकनगर तृतीय स्थान पटकाविले. पीएसएम अंतर्गत २५ निकषांवर संकल्प उत्सवात बेटी हा शब्द घेवून मुलींनी विविध कविता तयार करून सादरीकरण केले. प्रास्ताविक गट समन्वयका मंगला खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुलींनी उच्च शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय शाळा सोडणार नाही, अशी शपथ घेतली. कार्यक्रमाला गट शिक्षणाधिकारी सी.के. नंदनवार, शिक्षण विस्तार अधिकारी भलावी, बांते, केंद्र प्रमुख भाजीपाले, पानतावणे, रहांगडाले, खापर्डे, कुबडे, भुरे, शेंडे, महाराष्ट्र विद्यालय सिहोरा, सावित्री मेमोरियल गोबरवाही, राष्ट्रीय विद्यालय तुमसर येथील मुख्याध्यापक, शिक्षक तथा विद्यार्थीनींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
मुलींना वाचवा, त्या कुटुंबाचा अभिमान
By admin | Published: February 18, 2017 12:24 AM