मायक्रो फायनान्स कंपनीवर कारवाईची मागणी : तुमसर, मोहाडी येथील शेकडो महिलांची उपस्थिती तुमसर : स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेकडो बचत गटांच्या महिलांनी मायक्रोफायनान्स कंपन्यांवर नियंत्रण ठेऊन कर्ज वसुलीची दादागिरी बंद करावी, याकरिता तुमसर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेला. यावेळी तहसीलदार यांना निवेदन दिले. मायक्रोफायनान्स कंपन्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार असलेल्या एमफिन कंपनी सध्या संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या कंपन्यांची कर्ज वसुलीची दादागिरी सुरु झाली आहे. त्यामुळे नागरिकांत विशेषत: बचत गटातील महिलांमध्ये भीती निर्माण झाली आहे.या कंपन्या नियमानुसार व अटीनुसार कार्य करीत नाही. तुमसर व मोहाडी तालुक्यात जबरदस्तीने कर्ज वसुली सुरु केल्याचा आरोप शेकडो महिलांनी केला आहे. एकच महिला तब्बल आठ कंपन्यांतून कर्ज उचलून कर्जबाजारी होत आहे. याबाबत एमफिनने चौकशी का केली नाही. कंपन्या कर्ज देताना महिलांकडून उत्पन्नाबाबत दस्ताऐवज घेत नाहीत. याची साधी चौकशी करण्यात आली नाही. कंपन्यांचे गैरप्रकार एमफिनच्या लक्षात आले नाही का ? असा प्रश्न स्वाभीमान शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे. जिल्हा प्रशासनाने येथे लक्ष घालून शेतकरी आत्महत्यांनी ढवळून निघालेल्या भंडारा जिल्ह्यात मायक्रोफायनान्स कंपनीच्या तगाद्यापोटी महिलांवर आत्महत्येची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी उच्चस्तरीय सीआयडी चौकशी करून अहवाल पोलीस महासंचालकांना सादर करावा अन्यथा दहा दिवसाच्या आत कारवाई न केल्यास जिल्ह्यातील सर्व मायक्रोफायनान्स कंपन्यांना कुलूप ठोकण्याचे निवेदनात नमूद केले आहे. संघटनेचे जिल्हाप्रमुख राकेश चोपकरसह जिल्हासचिव सेलोकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी तथा तुमसर व मोहाडी तालुक्यातील बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)
बचत गट महिलांची तहसीलवर धडक
By admin | Published: February 11, 2017 12:23 AM