भारतीय शिक्षिका, कवयित्री, समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाचा प्रचार केला. त्यामुळे त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका ठरल्या. महिला क्षेत्रातील त्यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान विचारात घेता, शासनाने या वर्षीपासून ३ जानेवारी रोजी येणारी १८९ वी जयंती जिल्ह्यातील प्रत्येक गावात विविध कार्यक्रमांतर्गत साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत. महिला व बालविकास विभागच्या वतीने आज, रविवारी सकाळी ११.३० वाजता येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संदीप कदम राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार मून, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरसंगे, ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजय नंदागवळी उपस्थित राहणार आहे. यावेळी जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला बचत गटांचा तसेच विविध महिलांचा, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच महिला बालकल्याण विभागातील समुपदेशकांचा यावेळी सत्कार केला जाणार आहे. तसेच जिल्ह्यात एकाचवेळी ११.३० वाजता स्थानिक पातळीवर दिंडी तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
सावित्रीबाईंची जयंती रविवारी गावोगावी होणार साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:35 AM