दूरच्या शाळेचा विद्यार्थ्यांनी केला विरोध : तीन दिवसांपासून शिक्षण विभागाचे दुर्लक्षलाखांदूर : गावापासून तीन कि.मी. दूर शाळा, रस्त्यावरून रेतीने भरलेल्या ट्रकांची दिवसभर वर्दळ, जीवघेणे खड्डेमय रस्ते, वाहनामधून उडणाऱ्या रेतीच्या कणांचा त्रास. असह्य झाल्याने विद्यार्थ्यांनी दूरच्या शाळेचा विरोध करीत गावातील चौकात शिक्षकांविना झाडाखाली शाळा भरविल्याचा प्रकार इटान या लहानशा गावात घडला. तीन दिवसांपासून शिक्षण विभागाचे अधिकारी याठिकाणी न फिरकल्यामुळे पालकांमध्ये असंतोष पसरला आहे.वैनगंगा नदी काठावर वसलेल्या लाखांदूर तालुक्यातील इटान या गावाला पुराचा तडाखा बसत असल्याने सन १९७४ मध्ये या गावाचे पुनर्वसन करून तीन कि.मी. अंतरावर जागा उपलब्ध करून देण्यात आली. शाळा, ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आली. आजपर्यंत इटान येथील ७५ विद्यार्थी आबादी भूखंडावरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जात होते. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत चार शिक्षक आहेत. येथील १५ विद्यार्थी असे एकूण ९१ विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. महसूल विभागाने इटान रेतीघाटाचा लिलाव केल्याने इटान आबादी हा मार्ग दिवसभर ओव्हरलोड रेतीच्या ट्रकने वर्दळीचा ठरला आहे. तीन कि.मी. चा शाळेचा प्रवास लहान मुलांसाठी त्रासदायक ठरला असला तरी खड्डेमय रस्ते, ट्रकांमुळे अपघाताची भीती, रेतीच्या कणांमुळे होणारा त्रास असह्य झाल्याने ऐन पावसाळ्यात पालकांनी त्या ७५ विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेत गावातील मुख्य चौकात झाडाखाली उघड्यावर शिक्षकांशिवाय शाळा भरवली. यातील एका विद्यार्थ्याला दररोज शिक्षकाची भूमिका वठवावी लागत आहे. आबादी येथील शाळा ओस पडली असून केवळ १५ विद्यार्थ्यांची शाळेतील हजेरी विनोदाचा विषय ठरला आहे. शालेय पोषण आहार तयार करून व्यर्थ ठरत आहे. दुसरीकडे राज्य शासनाचा शिक्षण विभागाने ‘गाव तिथे शाळा’चा नारा देत सर्वशिक्षा अभियानावर कोट्यवधीचा निधी खर्च करीत आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले असले तरी मुख्य प्रवाहातील होतकरू विद्यार्थ्यांना प्रवाहाबाहेर नेण्याचा प्रयत्न तालुका शिक्षण विभागाकडून होत असल्याचा आरोप सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी केला आहे. जोपर्यंत गावात शाळा सुरु होणार नाही तोपर्यंत विद्यार्थी झाडाखालीच बसतील असा निर्धार पालकांनी केल्याने आता शिक्षण विभाग कोणता निर्णय घेतात याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांविना गावातच झाडाखाली भरली शाळा
By admin | Published: September 25, 2015 12:08 AM