भंडारा : राज्यातील २० टक्के विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचे मार्चपासून वेतन अडले असल्याने शिक्षकांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे वेतन अनुदान वितरित करण्यासाठी खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने सातत्याने पाठपुरावा केला. यात राज्य शासनाने २० टक्के अनुदानित शाळांच्या वेतनासाठी १८ मे रोजी माहे मार्च ते जूनपर्यंतचे वेतन ऑफलाइन सादर करण्याचे आदेश काढले.
राज्यातील खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या नियमित वेतनासाठी विधिमंडळाने मार्च २०२१ मधे निधी मंजूर केला असून, शिक्षण विभागाला मंजूर निधी वितरित करण्यात आला नसल्याने खाजगी शिक्षकांचे वेतन अडले होते, तसेच २० टक्के अनुदानित शाळा व वाढीव वर्ग तुकड्यांवरील शिक्षकांचेही मार्च २१ पासून वेतन झाले नाही. त्यामुळे खाजगी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने राज्याचे शिक्षण सचिव, वंदना कृष्णा व आयुक्त शिक्षण, विशाल सोळंकी यांना निवेदन देऊन तातडीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केलेली होती.
त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १८ मे रोजी एप्रिल महिन्याच्या नियमित वेतनासाठी निधी वितरित करून, तसेच २० टक्के अनुदानावर असणाऱ्या शाळांतील शिक्षकांना दिलासा दिला असून, त्यांनी मार्च ते जून २१ पर्यंत ऑफलाइन देयके सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यानुसार राज्यातील ज्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना १ नोव्हेंबर २०२० पासून २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे, अशा शाळा, तुकड्यांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च २०२१ ते जून २०२१ पर्यंतचे वेतन ऑफलाइन पद्धतीने अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. खाजगी अनुदानित शिक्षकांचे माहे एप्रिलचे नियमित वेतन ऑनलाइन पद्धतीने तातडीने फॉरवर्ड करावे, तसेच २० टक्के अनुदानित शिक्षकांचे ऑफलाइन वेतन सादर करावे, असे आवाहन खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रमोद रेवतकर, केंद्रीय सचिव विजय नंदनवार, कार्याध्यक्ष रहेमतुल्ला खान, विलास खोब्रागडे, दारासिंग चव्हाण, धनवीर कानेकर, ज्ञानेश्वर वाघ, संजय बोरगावकर, मोहन सोमकुवर, लोकपाल चापले, विजय आगरकर, पवन नेटे, गोपाल मुऱ्हेकर, ज्ञानेश्वर घंगारे आदींनी केले आहे.
बॉक्स
निर्णयानुसार या शाळांचा समावेश आहे
यात १२ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार माध्यमिक विभागातील ६१ माध्यमिक शाळा, शिक्षक ३०८ व २०६ शिक्षकेतर पदे आहेत, तसेच १८१ माध्यमिक शाळांच्या ५४३ वर्ग तुकड्यांवरील ७६२ शिक्षक पदे अशी एकूण १०७० शिक्षक व २०६ शिक्षकेतर पदे आहेत, तसेच प्राथमिक विभागातील १६७, प्राथमिक शाळांमधील ९४१ शिक्षक आणि १५८ प्राथमिक शाळांच्या ६२३ वर्ग, तुकड्यांवरील ७४७ शिक्षक पदे अशी एकूण १६८८ शिक्षक पदे आहेत, तसेच उच्च माध्यमिक विभागात १३३७ शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अतिरिक्त शाखांमधील ७८०० पूर्णवेळ व २७२ अर्धवेळ शिक्षक पदे आहेत, तसेच ७४८ शिक्षकेतर पदे, अशा एकूण ८८२० शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या वेतनाचा समावेश आहे.