भंडारा : विद्यार्थ्यांनी शिक्षकाला 'बंडू बाॅक्सर' म्हणून चिडवल्याने शिक्षकाचा राग अनावर होऊन त्यांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आंधळगाव येथील लाल बहादूर शास्त्री शाळेत घडली. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध मुलांची काळजी व संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद बडवाईक (५५) रा. आंधळगाव हे लाल बहादूर शास्त्री शाळेत गणित व मराठी शिक्षक आहेत. सहावी ते आठवीला शिकवितात. त्यांना काही विद्यार्थांनी 'बंडू बाॅक्सर' म्हणून चिडविले. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला. व त्यांनी रागात अहमद सलीम गोडील (१३) या विद्यार्थ्याला लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच त्याचे डोक्याचे केस पकडून बेंचवर आदळले. त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला.
याप्रकरणी त्याची आई तरन्नूम सलीम गोडील (३४) रा. गणेश नगरी भंडारा यांनी भंडारा ठाण्यात तक्रार दाखल केली. मुले नेहमीच असा प्रकार करून शिक्षकांना चिडवित असल्याची माहिती आहे. त्यामुळेच बडवाईक यांचा राग अनावर झाल्याचे सांगण्यात आले. भंडारा पोलिसांनी शिक्षक शरद बडवाईक यांच्याविरुद्ध भादंवि ३२४, ३२३ कलमांसह मुलांची काळजी व संरक्षण कायदा २००० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार वरकडे करीत आहेत.