विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात : संवेदनहीन शिक्षण विभागराजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविणाऱ्या जिल्हा परिषदांच्या शाळा तुटलेल्या वरुन फाटलेल्या अन् टेकूवर उभ्या आहेत. त्या शाळेच्या आतील भागातून पांढऱ्या आभाळाचे दर्शन होते. अशा या फाटक्या, तुटक्या टेकूवरच्या शाळेत लहान बालके अध्ययन करीत असल्याचा प्रकार शिक्षण विभागाला माहित आहे. तथापि, संवेदनहीन झालेल्या जिल्हा परिषद भंडाराच्या शिक्षण विभागाची झोप अजूनही उघडलेली नाहीे.कान्हळगाव / सिरसोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्वातंत्र्यापूर्वीची ईमारत पूर्णत: धोकादायक अवस्थेत आहे. याबाबत "लोकमत"ने २७ मार्च रोजी "टेकूवर उभी आहे शाळेची भिस्त" या शिर्षकाखाली बातमी प्रसिध्द केली होती. त्या बातमीने जिल्हा परिषदेने शिक्षण विभागात खळबळ माजली होती. दोन दिवसानंतर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविकांत देशपांडे, कार्यकारी अभियंता सुशिल कानेकर यांनी जिल्हा परिषद कान्हाळगावच्या प्राथमिक शाळेला भेट दिली होती. शाळेने निर्लेखन प्रकरण पाठविल्यानंतर दोन महिन्यात दोन वर्ग खोल्या उभ्या करुन दिल्या जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी त्यावेळी दिले होते. सदर शाळेने निर्लेखन प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविले आहे. एक आठवडा होवून शाळा सुरु झाल्या आहेत. पंरतु जिल्हा परिषद शाळा, कान्हळगावला नवीन वर्गखोल्या मंजूरीचे पत्रच आले नाही. तसेच धोकादायक ईमारतीत बसणारी छोटी बालके बसण्यासाठी कुठे पर्यायी व्यवस्था करायची याबाबत शिक्षण विभागाने कोणतेच मार्गदर्शन दिले नाही. जूनी ईमारत निर्लेखनाची मंजूरीही आजपर्यंत शिक्षण विभागाने दिली नाही. मुख्याध्यापक जगदिश निमजे यांनी धोकादायक ईमारतीत बसणारे विद्यार्थी कुठे बसवायचे याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना गटशिक्षणाधिकारी मोहाडी यांच्यामार्फत मार्गदर्शन मागविले आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकारी सदर शाळेची इमारत निर्लेखित करायची काय, नवीन वर्गखोल्या मंजूर झाल्या काय याविषयी खरं काय सांगायला तयार नाहीत. एका कर्मचाऱ्यांनी तर वर्गखोली मंजूर झाली असल्याचे सांगितले. पण, मंजूर झाल्याची माहिती कागदावर नसल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगीतले. तसेच पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला कान्हळगाव प्राथमिक शाळेच्या नवीन वर्गखोल्या मंजूर झाल्या काय, निर्लेखनाची मंजूरी याची कोणतीच खबर नसल्याचे सांगण्यात आले. कान्हळगाव शिवाय मोहाडी तालुक्यातील सात शाळा निर्लेखन मंजूरीची प्रतिक्षा करीत आहेत. कान्हळगाव/ सिरसोली प्राथमिक शाळेच्या पाठोपाठ जिल्हा परिषदेच्या मोहाडी तालुक्यात ५२ वर्ग खोल्या धोकादायक वर्गखोल्या असल्याची माहिती पंचायत समिती मोहाडीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सादर केली.जिल्हा परिषदने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालविला आहे. अधिकारी, पदाधिकारी, जनप्रतिनिधी, जिल्हा परिषद शाळेने शिक्षणाचा दर्जा वाढवावा, प्रत्येक उपक्रमात भाग घ्यावा, दर्जेदार शिक्षणाची कास धरावी आदी बोधामृत शिक्षकांना पाजले जातात. पण, ज्या शाळेत अध्यापन व अध्ययन करतांनी विद्यार्थी व शिक्षकांना जीव धोक्यात घालून धोकादायक इमारतीत राहावे लागते. याबाबत मात्र गंभीरतेने पदाधिकारी ना अधिकारी बघत नसल्याचे उघड आहे.
फाटलेले छत अन् ‘टेकू’ वरची शाळा धोकादायक
By admin | Published: July 03, 2017 12:40 AM