भंडारा : केंद्र पुरस्कृत पीएम श्री योजना अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगर पालिकांच्या १२ शाळांची निवड करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या टप्प्यात पीएम श्री उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी एकूण ७७.२९५ लाखाचा निधी शाळांना वर्ग करण्यात आला आहे. या निधीमुळे निवड झालेल्या १२ शाळांच्या शैक्षणिक व भौतिक विकासाला गती मिळणार आहे. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शाळा निर्माण होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करून शासनाकडून प्राप्त अनुदान विड्रॉल लिमिट पीएफएमएस प्रणालीद्वारे १२ शाळांमधील शाळा व्यवस्थापन समित्यांना ७७.२९५ लाखाचा निधी वितरीत केला आहे. वितरीत निधीचा खर्च हा शासनाने ठरवून दिलेल्या बाबींवर खर्च करायचा आहे. त्यासाठी वित्तीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, खर्चासाठी आवश्यक मंजुरी घ्याव्यात, समग्र शिक्षा अंतर्गत उपक्रम अंमलबजावणीबाबत वेळोवेळी दिलेल्या निकषांनुसार खर्च करण्यात यावे, खर्चाचा अहवाल उपयोगी प्रमाणपत्रांसह जिल्हा परिषदेला सादर करावा, असे स्पष्ट आदेश जिल्हा प्रकल्प समन्वयक तथा मुख्य कार्यपालन अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी संबंधीत शाळा, गट शिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
या बाबींसाठी होणार अनुदान खर्चइंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करता यावी, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी विद्यार्थ्यांना मिळावी, या हेतूने पीएम श्री योजनेचा निधी वितरण करण्यात आला आहे. या निधीतून शाळा परिसरात आकर्षक बागबगीचे, ग्रंथालय, खेळांचे विविध साहित्य, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त फर्निचर, शाळा मैदानांवर खेळ संसाधनांचा विकास, मुलींना सॅनिटरी पॅड, शाळा परिसरात शैक्षणिक रंगरंगोटी, शैक्षणिक ओटा व भित्तीचित्र निर्मिती, मुलांची राज्याबाहेर शैक्षणिक सहल, वार्षीक शाळा खर्च, स्वरक्षणाचे प्रशिक्षण तसेच समाजसहभाग वाढविण्यावर खर्च करता येणार आहे.
शाळांना वितरीत झालेले अनुदानभंडारा तालुक्यातील वाकेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ७.४५ लाख, मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी ६.२२५० लाख, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आंधळगाव ७.०९०० लाख, तुमसर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल सिहोरा ५.३००० लाख, नगर परिषद हायस्कूल तुमसर ५.९१०० लाख, लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद गांधी विद्यालय लाखनी ६.८९५० लाख, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाखोरी ४.४१०० लाख, साकोली तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल सानगडी ७.३३५० लाख, जिल्हा परिषद उच्च् प्राथमिक शाळा सेंदूरवाफा ४.२४००, पवनी तालुक्यातील नगर परिषद विद्यालय पवनी ७.०४०० लाख, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांगली चौरास ७.७००० लाख, लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मडेघाट ७.७००० लाख यांना एकूण ७७.२९५ लाखाचा निधी वितरीत करण्यात आला.
ग्रामीण व शहरी भागातील जिल्हा परिषद व नगर पालिका संचालीत शाळांतील सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत टिकाव लागावा, शैक्षणिक व भौतिक प्रगतीतून गुणवत्ता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा व दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने पीएम श्री योजनेचा अनुदान शाळांना वितरीत करण्यात आला आहे. शाळा समित्यांनी योग्य पद्धतीने निधीचा विनियोग करून शाळांचा कायापालट करावा.- रवींद्र सोनटक्के, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. भंडारा.