देवानंद नंदेश्वर / प्रशांत देसाई भंडारापेशावर येथे झालेल्या प्रकारानंतर शहरातील शाळा महाविद्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील बहुतांश शाळा महाविद्यालयांना संरक्षक भिंती नाहीत. कॉन्व्हेंटमध्ये चोखसुरक्षा व्यवस्था आहे तर काही शाळा वगळता बहुतांश शाळांमधील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे वास्तव ‘लोकमत’ चमुने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.शहरातील मोठ्या शाळा आणि कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या हजारावर आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात शाळा किंवा कॉन्व्हेंट प्रशासनाने कुठली खबरदारी घेतात याची पाहणी करण्यासाठी गेले असता या शाळा व कॉन्व्हेंटमध्ये सदर चमूला गेटवरच सुरक्षा कर्मचाऱ्याने संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रवेश दिला. काही कॉन्व्हेंटमधील गेटवर प्रवेश नाकारला. बऱ्याच प्रयत्नानंतर ज्या विद्यार्थ्याशी काम आहे, त्यालाच भेटण्यासाठी मुख्याध्यापकाच्या कक्षासमोरील एका कार्यालयात बसण्यासाठी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आई-वडिलांना वगळता कुणालाही प्रवेश नसल्याचे एका कॉन्व्हेंटमध्ये सांगण्यात आले. शहरातील बहुतांश कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात येत असल्याचे दिसून आले. काही अनुदानित शाळा वगळता बहुतांश शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. शासनाचे कोट्यवधी रुपयाचे अनुदान घेणाऱ्या शाळांमध्ये कुणालाही, कुठेही, कधीही प्रवेश मिळविता येतो, हे स्पष्टपणे दिसून आले. शहरातील बहुतांश हायस्कूलमध्ये सदर प्रतिनिधी थेट आतपर्यंत गेले. कार्यालयामध्ये भेट देऊन परत आले. वर्गखोल्यांची पाहणी केली मात्र शिपाई अथवा इतर कोणत्याही कर्मचाऱ्यानी विचारणाही केली नाही. यामुळे हायस्कूल प्रशासन शाळांचा सुरक्षेबाबत काहीही उपाययोजना करीत नसल्याचे समोर आले. चौकीदार बसलेले; विचारपूस शून्यशाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर चौकीदार बसलेला असतो. विद्यार्थ्यांव्यतिरिक्त शाळेत प्रवेश करणाऱ्यांना त्यांच्याकडून विचारपूस केली जात नाही. किंवा थांबविले जात नसल्याचा अनुभव एका शाळेचा प्रवेशद्वाराजवळ आला. या प्रकाराने नामांकीत शाळेत प्रवेश करताना, शाळेतून बाहेर जातानाही प्रवेशद्वारावर विचारपूस केली जात नसल्याचे चित्र दिसून आले.सुरक्षा रक्षकांचा वयोमर्यादेचा निकष वाऱ्यावरशहरातील काही खासगी व विना अनुदानीत शाळांनी सुरक्षा व्यवस्थेसाठी ५८ ते ६२ वयोगटातील वृद्धांना नियुक्त केले आहे. जबाबदारीच्या या कामासाठी या वयोगटातील व्यक्ती अटीतटीच्या प्रसंगी असमर्थ ठरू शकतात. काही शाळांनी कंत्राटदारामार्फत तर काही शाळांनी स्वत: तैनात केलेली सुरक्षा यंत्रणा कार्यक्षम ठरु शकते कां? याकडे शाळा व्यवस्थापन समितीसोबत त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पालकांनीही लक्ष दिले पाहिजे. सुरक्षा रक्षकांना ‘ड्रेस कोड’ आवश्यकसुरक्षेची अत्यंत गंभीरतेने दखल घेणाऱ्या शाळा देखील शहरात आहेत. मात्र सुरक्षा रक्षक साधारण वेशात फिरत असल्याने शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या व विद्यार्थ्यांवर वचक राहत नाही. त्यासाठी शाळा व्यवस्थापनाने ड्रेस कोड अनिवार्य करणे गरजेचे आहे.काय हटकता? अंगावर येतात!शाळेत प्रवेश करणाऱ्या कुणाकुणाला हटकणार? हटकले, विचारपूस केली, तर काही जण अंगावर येतात. कुणाकुणाशी वाद घालणार? त्यापेक्षा शाळेत प्रवेश करणाऱ्यांवर शंका आल्यास विचारपूस करुनच प्रवेश दिला जातो, असे एका शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील चौकीदाराने सांगितले.
शाळांची सुरक्षा वाऱ्यावर!
By admin | Published: December 29, 2014 12:55 AM