चंदन मोटघरे
लाखनी (भंडारा) : लाखनी तालुक्यात चार दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीचा कळप शनिवारी सकाळी ८.३० वाजता रामपुरी शिवारातून जंगलाकडे चित्कार करीत रवाना झाला. एका पोठोपाठ एक हत्ती जातांनाचा थरार अनेकांनी अनुभवला. कुतूहल मिश्रिती भीती परिसरातील गावकऱ्यांमध्ये दिसत होती.
साकोली तालुक्यातून चार दिवसापूर्वी जंगली हत्तीचा कळप लाखनी वनपरिक्षेत्रात दाखल झाला. तीन दिवस रेंगेपाळ कोहळी परिसरात या कळपाने धुमाकूळ घातला. शेतातील पिकांसह गोशाळेचे नुकसान केले. दिवसभर विश्रांती करून हत्तीचा कळप रात्री धुमाकूळ घातल आहे. या हत्तींना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
शुक्रवारी रात्री रामपुरी परिसरात धुमाकूळ घतला. मुकुंदा भालेराव, अरूण फुलके यांच्या शेतातील धानाच्या ढिगाऱ्यांचे नुकसान केले. देवरीगोंदी परिसरात धुमाकूळ घालत हत्तीचा कळप शनिवारी सकाळी ८.३० वाजता जंगलाकडे रवाना झाला. चित्कार करीत एका पाठोपाठ एक जाणाऱ्या हत्तींना पाहण्यासाठी शेतशिवारात मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी या हत्तीचे व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले. हत्तींचा कळप मोठ्या प्रमाणत नुकसान करीत असले तरी नागरिकांत हत्ती पाहण्याची मोठी उत्सुकता दिसत आहे. वनविभागाचे पथक या हत्तीवर नजर ठेवून आहे.