करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील निलज बुज, कान्हळगाव, ढिवरवाडा परिसरात दिड दोन वर्षाच्या बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. वैनगंगा नदीकाठाशेजारील निलज शेतशिवारात बस्तान मांडले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभाग मात्र शेतकऱ्यांना फटाके फोडून बिबट्याला हुसकावण्याचा सल्ला देत आहेत. करडी परिसरातील तिन्ही गाव वैनगंगा नदीकाठाशेजारी वसलेले गाव आहेत. मागील आठवड्यात कान्हळगाव येथील भोयर यांचे घरी गाईच्या गोठ्यात शिरून एका बछड्याचा जीव बिबट्याने घेतला. वनविभागाला त्यावेळी माहिती दिली असता रात्री तुम्ही गस्त करा, नुकसान झाल्यास माहिती द्या, अशा अफलातून सल्ला त्यावेळी सुद्धा वनविभाग तुमसरच्या अधिकाऱ्यांनी दिला होता. ढिवरवाडा गावातही बिबट्याची दहशत आहे. नुकसान भरपाईसाठी वनविभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना कार्यालयाचे उबंरठे झिजवायला लागत आहे. नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत आहे. सद्या निलज बु. वैनगंगा शेतशिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे. शेतकरी सायंकाळी व सकाळी शेतावर जाण्यास घाबरत आहेत. एखाद वेळी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात झुडपे आहेत. त्यामुळे अडचणी असल्याचे वन विभाग तुमसरचे म्हणणे आहे. यावर वनविभाग काय उपाययोजना करते यावर लक्ष लागून आहे. (वार्ताहर)
बिबट्याचा धुमाकूळ
By admin | Published: February 01, 2016 12:37 AM