अशोक पारधी लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : प्राचीन व ऐतिहासिक नगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विदर्भाची काशी पवनी येथील दसरा उत्सवात प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. चंडिकामाता मंदिराच्या परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. विविध साहसी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. रावणदहन होईपर्यंत गर्दी कायम होती. जणू कोराेना आता हद्दपार झाल्याचा समज नागरिकांनी करून घेतल्याचे गर्दीवरून दिसत होते.पवनी येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून माता चंडिका मंदिराच्या परिसरात दसरा साजरा केला जातो. गतवर्षी कोरोनाचे संकट असल्याने पहिल्यांदाच दसरा गर्दीशिवाय साजरा झाला होता. यावर्षी गर्दी न करता उत्सव साजरा करण्याची सूचना प्रशासनाने केली होती; पण नागरिकांनी न जुमानता नगरातील चौका-चौकात व दसरा उत्सवाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी केली. उत्सव समारंभापासून दीड वर्ष दूर राहिलेले नागरिक दसरा उत्सवाचे निमित्त साधून घराबाहेर पडले. पवनी येथील दसऱ्याला स्थानिक आखाड्यामुळे विशेष महत्त्व आहे. शस्त्रपूजा करून व युद्धकौशल्याचे प्रदर्शन करीत आखाड्याच्या वस्तादांनी नगरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढली. माता चंडिका मंदिर परिसरात उत्सव स्थळी आखाडे दाखल झाले. उसळलेली गर्दी पाहून आखाड्यातील वस्ताद व त्यांचे शिष्य यांनी दांडपट्टा, लाठीकाठी, भाला व तलवारबाजी, तसेच विविध साहसी प्रात्यक्षिक दाखवून नागरिकांकडून प्रतिसाद मिळविला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सर्व प्रयोग थांबले; पण रावणदहन होईपर्यंत नागरिकांनी जागा सोडली नाही.गामा वस्ताद जुना आखाडा, गामा वस्ताद नवीन आखाडा, छत्रपती शिवाजी महाराज जुना आखाडा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन आखाडा, सार्वजनिक चंडिका आखाडा, जय बजरंग आखाडा आदी उत्सवात सहभागी झाले होते. चंडिका मंदिर देवस्थान कमिटी, पोलीस प्रशासन, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय संच, आखाड्यात वस्ताद व नगरातील विविध संघटनांचे स्वयंसेवक शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी प्रयत्न करीत होते. यावेळी परंपरागत युद्धकौशल्याला फाटा देऊन युवा पिढी हुल्लड बाजी करताना दिसल्याने भाविकांत नाराजीचा सूर पाहायला मिळाला. मात्र, कोरोनाच्या सावटात झालेल्या या गर्दीने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
कोरोनाची भीती संपली?- संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने पवनी येथील दसरा उत्सवात गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. याबाबत आदेशही काढण्यात आला होता. परंतु दसरा उत्सवात झालेली गर्दी पाहता कोरोनाची भीती संपली की काय? अशी शंका येऊ लागली आहे. पवनी येथे झालेल्या प्रचंड गर्दीत फिजीकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन तर झाले. कुणीही मास्क लाऊन नव्हते.