डोंगरला येथील प्रकार : परिचर बडतर्फलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर पंचायत समिती अंतर्गत डोंगरला येथे ग्रामपंचायतीला खुद्द पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला सील ठोकले. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून चार दिवसानंतर सील काढण्यात आली. ग्रामसेवक व परिचर अनुपस्थितीमुळे सील ठोकण्यात आल्याची चर्चा गावात सुरु आहे. या प्रकरणात खंडविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीविना ग्रामपंचायतीला सील कशी ठोकण्यात आली हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. सील ठोकण्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. नियमानुसार खंडविकास अधिकाऱ्यांनी परवानगी घेण्यात आली नव्हती अशी माहिती आहे. मासीक सभा ग्रामपंचायत कार्यालय बाहेरच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. ठराव लिहिण्याकरिता जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला येथे बोलविण्यात आले होते. चार दिवसपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय कुलूप बंद होते. येथील ग्रामस्थांना दाखल्याकरिता प्रतीक्षा करावी लागली. येथील ग्रामसेवक अपघातात जखमी झाले होते तर ग्रामपंचायतीचा परिचर हा आजारीपणामुळे कर्तव्यावर नव्हता. या संदर्भात त्याने रजेचा अर्ज पंचायत समिती कार्यालयाकडे केला होता. येथील ग्रामपंचायत परिचर खेमराज शरणागत याला दि. २ जुलै रोजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी बडतर्फ केले. ग्राम पंचायत कार्यालयाला सील ठोकण्याचा प्रकार गंभीर आहे. या संदर्भात खंडविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी तुमसर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर राऊत यांनी केली आहे.
पदाधिकाऱ्यांनी ठोकले ग्रामपंचायतीला सील
By admin | Published: July 05, 2017 12:55 AM