लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओबीसी आरक्षणाने स्थगित झालेल्या जिल्हा परिषदेच्या १३ गटांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचार आता चरमसीमेवर पोहोचला असून, बहुतांश गटांमध्ये तिरंगी तर काही गटांत सरळ लढतीचे चित्र आहे. कोरोना संसर्ग असल्याने अगदी मोजक्या सभा होत असून, उमेदवार प्रत्यक्ष भेटीवर भर देत आहेत.तुमसर तालुक्यातील चुल्हाड, सिहोरा आणि गर्रा या तीन गटांची निवडणूक होत आहे. तीन जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात असून, तीनही ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र आहे. नेत्यांच्या सभा झाल्या. परंतु कोरोनामुळे उपस्थिती अत्यल्प दिसत होती. मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव आणि कांद्री गटात सरळ लढत तर वरठी गटात तिरंगी लढत होत आहे. तीन जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. भंडारा तालुक्यातील सिल्ली गटासाठी निवडणूक होत असून, सहा उमेदवार रिंगणात आहेत. येथेही तिरंगी लढतीचे चित्र आहे. पवनी तालुक्यातील ब्रह्मी व भुयार या दोन गटांत ११ उमेदवार रिंगणात असून, येथेही तिरंगी लढतीचेच चित्र आहे.कोरोना संसर्ग असल्याने उमेदवारांना प्रचार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेत्यांच्या सभा होत असल्या तरी त्या कमी मतदारांच्या उपस्थितीत घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे उमेदवार थेट मतदारांच्या भेटीवर भर देत आहेत. आता १८ जानेवारी रोजी मतदान होणार असून, उमेदवार विजयासाठी जीवाचे रान करीत आहेत.
लाखनीच्या चारही गटात तिरंगी लढत
- जिल्ह्यातील सर्वाधिक चार गटांत लाखनी तालुक्यात निवडणूक होत आहे. लाखोरी, मुरमाडी/सावरी, केसलवाडा/वाघ आणि मुरमाडी/तुप या गटांत ही निवडणूक होत आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू असून, चार जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. चारही गटांत तिरंगी लढतीचे चित्र असून, कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक उमेदवार विजयासाठी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर देत आहे.
पंचायत समितीत चुरस- जिल्ह्यातील सात पंचायत समितीच्या स्थगित झालेल्या २५ जागांसाठी जिल्ह्यात चांगलीच चुरस दिसत आहे. उमेदवार प्रचारासाठी मतदारांच्या भेटी घेत आहेत. मात्र कोरोना संसर्गामुळे त्यांना प्रचार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पंचायत समितीतही तिरंगी-चौरंगी लढतीचे चित्र असून उमेदवार विजयासाठी प्रयत्न करीत आहे.