चारजण गजाआड : खुनासाठी ५० हजारांची सुपारीसाकोली : रात्रीच्या सुमारास दुचाकीने घरी परतणाऱ्या ४२ वर्षीय एका इसमाचा अपहरण करून खूनप्रकरणी चार जणांना अटक केल्यानंतर या प्रकणाचे रहस्य उलगडले. साकोली येथील पंचशील वॉर्डातील रहिवासी नामदेव ऊर्फ नरेंद्र बावने यांचा २३ एप्रिलच्या रात्री १०.३० वाजता करण्यात आले होते. नामदेवचा खून पूर्वनियोजित कट रचून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आणि या खुनाची सुपारी मृतक नामदेवच्या पत्नीच्या मानलेल्या भावाने ५० हजार रूपयांची सुपारी दिली होती. गोसीखुर्द कालव्यात सापडला होता मृतदेह व्यवसायाने वाहनचालक असलेल्या नामदेवचे अपहरण कारने करण्यात आले. तीन दिवसानंतर २६ एप्रिल रोजी नामदेवचा मृतदेह पवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरंभी परिसरात गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात आढळून आला होता. आरोपीनी नामदेवचा खून केल्यानंतर मृतदेहाला मोठा दगड बांधून नहरात फेकून दिला होता. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर जिल्हा पोलिसांनी या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला.आरोपींनी केलेल्या कृत्याचा पुरावा न सापडल्यामुळे या घटनेचा तपास पोलिसांसाठी आव्हान ठरले होते. दरम्यान खुनाची सुपारी दिल्याची माहितीवरून पोलिसांनी तपासचक्रे फिरविली. संशयावरून मोठा ताजबाग नागपूर येथील रहिवासी अकरम मुनीर पठान (२०) याला ताब्यात घेऊन पोलिसांनी हिसका दाखविताच या खुनात सहभागी दोन आरोपींची नावे सांगितली. त्याआधारावर पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अमित भगवान कन्नाके (२७) रा.देलनवाडी वॉर्ड ब्रम्हपुरी, सिद्धांत आसाराम मडावी (२१) रा.कुकडहेटी, ता.सिंदेवाही याला अटक केली.काय होते प्रकरणमूळ साकोली तालुक्यातील महालगाव (सुकळी) येथील रहिवासी नामदेव ऊर्फ नरेंद्र बावने हा पत्नीला नेहमी त्रास द्यायचा. हा प्रकार नामदेवच्या पत्नीने पुरूषोत्तम भागडकर रा.लाखांदूर या मानलेल्या भावाला सांगितला. त्यामुळे वचपा काढण्यासाठी भागडकरने नामदेवच्या खुनाची ५० हजार रूपयांची सुपारी दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी अपहरण आणि खूनाचा मुख्य सूत्रधार पुरूषोत्तम भागडकर याला शुक्रवारला अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून अपहरणासाठी वापरलेली कार क्रमांक एम.ए.३३/ए.२६७९ हे वाहन जप्त केले. याप्रकरणी आरोपींना ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्यचे पोलिसांचे म्हणने आहे. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक विनीता साहू यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर यांच्या नेतृत्वात सुरू आहे.
‘त्या’ खूनाचे रहस्य उलगडले
By admin | Published: May 08, 2016 12:25 AM