जिल्ह्यात ४१६ जलकुंभ : एकाही ठिकाणी चौकीदार नाहीभंडारा : नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी गावागावात जलकुंभ तयार करण्यात आले आहेत. परंतु या जलकुंभाच्या सुरक्षेसाठी कुठेही चौकीदार नाही. त्यात कुणी विषप्रयोग केला तर अख्खे गाव वेठीस धरले जाऊ शकते, अशी भयावह परिस्थिती आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील कुलकुली ग्रामपंचायतच्या सार्वजनिक नळ योजनेच्या जलकुंभात अज्ञात इसमाने विषारी द्रव्य टाकल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली, त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत चमू’ ने सोमवारला गावागावांतील जलकुंभांना भेटी देऊन पाहणी केली असता तिथे कुणीही सुरक्षारक्षक दिसून आला नाही. जीवनावश्यक असलेले पाणी ज्या ठिकाणाहून पुरवठा करण्यात येते त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे या जलकुंभावर सहजरित्या कुणालाही प्रवेश करता येतो. भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखांदूर, लाखनी, पवनी, दिघोरी, कोंढा या ठिकाणी लोकमत चमू जलकुंभावर चढत असताना कुणीही त्यांना रोखले नाही. सुरक्षा रक्षकाची नियुक्ती न केल्यास गडचिरोली जिल्ह्यात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात ३६५ नळयोजना आहे. भंडारा तालुक्यातील भिलेवाडा टेकडीवर असलेल्या विशाल जलकुंभातून एमआयडीसीला पाणीपुरवठा होतो. जलकुंभाचे पुन्हा बांधकाम असले तरी रॅलींगमधून आतमध्ये प्रवेश करून वर चढता येते. जलकुंभाची स्थिती नंबर वन असली तरी सुरक्षेची उपाययोजना मात्र शून्य आहे.
जलकुंभांची सुरक्षा धोक्यात
By admin | Published: June 21, 2016 12:25 AM