इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : गोसेखुर्द धरणांतर्गत वैनगंगा नदीतील बॅक वॉटर शहरात शिरु नये यासाठी जवळपास दिड दशकांपुर्वी शहराच्या सभोवताल उभारण्यात आलेली सुरक्षा भिंत नावापुरती उरली आहे. भिंतीच्या जवळून गेलेल्या बायपास रस्त्याचेही हाल झाले असून या बांधकामासाठी लागलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले काय? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.विदर्भातील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गणला जाणारा गोसेखुर्द (इंदिरा सागर) प्रकल्प पुर्ण झालेला आहे. परंतु पुनर्वसनाची कामे अजूनही सुरुच आहेत. याचाच एक भाग म्हणून भंडारा शहरात वैनगंगा नदीतील बॅक वॉटर शहरात शिरु नये यासाठी वैनगंगा नदीच्या काठावर तद्वतच शहराच्या सिमेवर सुरक्षा भिंत उभारण्याचे काम सुरु करण्यात आले. जवळपास दिड दशकांपुर्वी बांधकामाला सुरुवात करण्यात आली. पिंडकेपार (कोरंभी) ते शहराला वळसा घालून भंडारा-वरठी राज्यमार्गावरील आठवले समाजकार्य महाविद्यालयामागील परिसरातून सुरक्षा भिंतीचे बांधकामाचे काम हाती घेण्यात आले. तत्कालीन बांधकामात जवळपास ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची बाब तेव्हा ऐकीवात होती. पिंडकेपार हद्दीतून ते आयटीआय पर्यंतच्या भागातील एकूण १० किलो मिटर लांबीची सुरक्षा भिंती माती व काळ्या दगडांच्या सहाय्याने बांधण्यात आले. मात्र त्यानंतर उंचीवरील रस्त्याचे बांधकाम आजही जैसे थे असे आहे.याशिवाय या सुरक्षा भिंतीला लागून असलेला रस्ता जागोजागी फुटलेला असून मोठ्या प्रमाणात गिट्टी उखडल्याने रहदारीला अडचण निर्माण होत आहे. सद्य स्थितीत या मार्गाहून आजही जड वाहतूक सुरु आहे. महामार्गावर वाहतुकीचे टेंशन वाढल्यास याच बायपास मार्गाचा अवलंब करण्यात येतो, हे येथे विशेष.रस्त्यावर झाडे अन् खड्डेच खड्डेदहा किलोमीटर लांबीच्या सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या रस्त्यावर लहान झाडीझूडपे व झाडे वाढलेली आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात या रस्त्यातून जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. उन्हाळ्याची सुरुवात झाली असून पावसाळ्याला बराच कालावधी शिल्लक आहे. उन्हाळ्यात या सुरक्षा भिंतीचे काम पुन्हा सुरु करुन जड वाहनांना चांगला मार्ग रहदारीसाठी सुरु करता येवू शकतो. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष घालून शहराला भविष्यकालीन संभाव्य पुरपरिस्थीतीपासून बचाव तथा विकास कामाकडे जोर देणे गरजेचे झाले आहे. बहुतांश ठिकाणी पुलाचे बांधकामही अजूनपर्यंत झालेले नाही.
सुरक्षा भिंत उरली नावापुरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:22 AM
गोसेखुर्द धरणांतर्गत वैनगंगा नदीतील बॅक वॉटर शहरात शिरु नये यासाठी जवळपास दिड दशकांपुर्वी शहराच्या सभोवताल उभारण्यात आलेली सुरक्षा भिंत नावापुरती उरली आहे.
ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांचा चुराडा : दीड दशकांपासून बांधकामाची प्रतीक्षा