इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आईने मारले म्हणून एक साडेपाच वर्षाचा मुलगा घरून निघून गेला. सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. पोलिसातही तक्रार दिली. मात्र थांगपत्ता लागत नव्हता. सात वर्षाचा काळ लोटला. दररोज आईची नजर रस्त्यावर भिरभिरत मुलाचा शोध घेत होती. अशातच मंगळवारी एक निरोप आला अन् बुधवारी भंडारात महिला व बालकल्याण विभागाच्या पुढाकाराने माय-लेकाची भेट झाली. अन् काळजाच्या तुकड्याला बघून आईने हंबरडा फोडला.ही कुण्या चित्रपटाची पटकथा नसुन नागपूर येथून बेपत्ता झालेल्या एका मुलाचे वास्तव होय. पवन शेखर पाटील रा. नागपूर असे या बालकाचे नाव आहे. पवन हा साडेपाच वर्षांचा असतांना आई प्रतिमा पाटीलने पवनला बेलण्याने मारले होते. याच रागातून पवन रेल्वेत बसून पळून गेला. त्यावेळी तो पहिल्या वर्गात शिकत होता. पवन घरुन निघून गेल्यानंतर पालकांनी त्याचा शोध घेतला. पोलिसात तक्रारही नोंदविली. मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. पाटील कुटुंब नागपूरच्या इंदिरानगरात वास्तव्यास आहे. इमामवाडा पोलीसांशी सतत संपर्क साधून मुलाची विचारणा केली. पोलीसही शोध घेवून शकले नाही. अशातच भंडारा येथील महिला व बालकल्याण विभागाला पवन पाटील नामक मुलगा हरविल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात जिल्हा व बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी भंडारा पोलिसांच्या मदतीने शोध घेतला.तक्रारीच्या अनुषंगाने पवन अमरावती येथील बाल सुधार गृहात असल्याचे लक्षात आले. याची सूचना मंगळवारी पवनच्या आईला देण्यात आली. बुधवारी भंडारा येथील जिल्हा बाल विकास विभागाच्या कार्यालयात आई व मुलाची भेट झाली. सात वर्षानंतर काळजाच्या तुकड्याला बघून आईने हंबरडा फोडला. यावेळी पवनची मोठी बहीण प्रियंकाही सोबत होती. पवनला एक मोठा भाऊ असून त्याचे नाव आकाश आहे.भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही यासाठी सहकार्य केले. पोलिसांच्या वॉटस्अॅप ग्रूपवर आलेल्या माहितीवरून पोलिसांनीही शोध मोहीम जारी केली होती.आता बारा वर्षाचा असलेला पवन म्हणाला, ‘आईने बेलण्याने मारल्याने आपण घरुन पळालो व रेल्वेत बसलो, आता मी कधीही असा करणार नाही. मला आई, बहीन व वडिलांची सातत्याने आठवण यायची पण मी कुठे राहतो हे मला आठवत नव्हते. त्यामुळेच मी आईपासून दूर होतो. नितीनदादा मुळे मला माझी आई मिळाली असे सांगायलाही पवन विसरला नाही. या शोध मोहिमेत अजीत नागोसे, नामदेव भुरे, शिल्पा वंजारी, सरिता रहांगडाले, निलम बेंदवार यांनी सहभाग घेऊन पवनला आई मिळवून दिली.इमामवाडा पोलिसांनी खऱ्या अर्थाने तपासात मदत केली. अमरावती येथील बाल सुधारगृहानेही माहिती उपलब्ध करुन दिली. त्यामुळेच पवनचा शोध लागला. मुलाला त्याची आई मिळाल्याने या तपासाचे खरे समाधान आम्हाला मिळत आहे.-नितीनकुमार साठवणे,संरक्षण अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, भंडारा.
काळजाच्या तुकड्याला बघून आईने फोडला हंबरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:37 PM
आईने मारले म्हणून एक साडेपाच वर्षाचा मुलगा घरून निघून गेला. सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. पोलिसातही तक्रार दिली. मात्र थांगपत्ता लागत नव्हता. सात वर्षाचा काळ लोटला. दररोज आईची नजर रस्त्यावर भिरभिरत मुलाचा शोध घेत होती. अशातच मंगळवारी एक निरोप आला अन् बुधवारी भंडारात महिला व बालकल्याण विभागाच्या पुढाकाराने माय-लेकाची भेट झाली. अन् काळजाच्या तुकड्याला बघून आईने हंबरडा फोडला.
ठळक मुद्देसात वर्षानंतर माय-लेकाची भेट : महिला व बालकल्याण विभागाचा पुढाकार, आईने मारले म्हणून गेला होता घरून निघून