ग्रामपंचायत आंधळगावद्वारे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय आंधळगाव येथील बगीचा व कार्यालयातील विद्युत फिटिंगच्या कामातसुद्धा मोठा भ्रष्टाचार झाला आहे. एकच व्यक्ती दोन कामावर उपस्थित असताना, तसेच गणेश बांडेबुचे यांना देण्यात आलेला जनावरांचा गोठा त्यांच्या स्वतःच्या जागेवर नसताना व जनावरेसुद्धा त्यांच्याकडे नसताना, तक्रारीत तथ्य नसल्याचा व तक्रार खोटी असल्याचा चौकशी अहवाल गटविकास अधिकारी लाखनी यांनी कोणत्या आधारे दिला, असा प्रश्न सातपुते यांनी उपस्थित केला असून हा अहवाल मॅनेज करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पुन्हा तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात सुनावणीसाठी बोलावण्यात आले व तीन दिवसात पुन्हा निष्पक्ष चौकशी करण्याचे तोंडी आश्वासन दिले गेले, परंतु चौकशी झाली नाही. आता सार्वजनिक बांधकाम उपविभाग जिल्हा परिषदचे शाखा अभियंता किशोर निनावे यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे. परंतु चौकशीच्या वेळी तक्रारदाराला उपस्थित राहण्याचे कळविण्यात यावे. जेणेकरून निष्पक्ष चौकशी करण्यास सहकार्य होईल, अशी मागणी करण्यात आली असून अजूनपर्यंत त्याचे उत्तर मिळालेले नाही. मुख्यमंत्र्यांनी सातपुते यांच्या तक्रारीची दखल घेऊन योग्य चौकशी करण्याचे पत्र जिल्हाधिकारी भंडारा यांना पाठविले आहे व त्याची एक प्रत सातपुते यांना पाठविण्यात आली आहे. जर २५ जानेवारीपर्यंत योग्य व निष्पक्ष चौकशी करण्यात आली नाही तर २६ जानेवारीला मी आंधळगाव येथे आत्मदहन करणार, असा इशारा किरण सातपुते यांनी पाठविलेल्या पत्राद्वारे दिला आहे.
भ्रष्टाचाराची योग्य चौकशी न झाल्यास प्रजासत्ताकदिनी आत्मदहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:29 AM