लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पेन्शनधारकांना ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात विहीत मुदतीत ज्या बँकेत आपल्या खात्यावर पेन्शन जमा होते तेथे जाऊन हयातनामा सादर करावा लागतो, याच पेन्शनधारकांना बँकेमध्ये गेल्यावर आपले नाव यादीत कुठे आहे, याची शोधाशोध करताना कसरत करावी लागत आहे. कारण, बँकेमध्ये केवळ एकच यादी आणि त्या यादीत असणारी नावे संबंधित पेन्शनधारकाच्या नावाच्या पहिल्या अक्षराने मांडली असल्याने ती शोधणे कठीण जात आहे.
काहीजण आडनावाप्रमाणे अक्षर शोधत आहेत, तर काहींना यादीतील नावे श्री, श्रीमती अशा नावापासून जोडून समाविष्ट केल्याने सापडणे कठीण होत आहे. यामुळे ज्येष्ठांची काहीशी कसरत होत आहे. जिल्ह्यात विविध शासकीय विभागातून तसेच शिक्षक आणि विविध पदावरून सेवानिवृत्त झालेल्यांची पेन्शन सेवानिवृत्ती वेतन जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयामार्फत पेन्शनधारकांनी नमूद केलेल्या बँकेच्या खात्यावर जमा होते. यात संबंधित पेन्शनधारक हयात आहेत की नाहीत, याची वर्षातून एकदा ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात शहानिशा करण्यासाठी त्यांना बँकेत जाऊन स्वाक्षरी करून हयातनामा द्यावा लागतो. यंदा ३० नोव्हेंबर अंतिम तारीख आहे. अशाच काही पेन्शनधारकांना विविध बँकेत गेल्यावर बँकेच्या सध्या सुरू असलेल्या वेगवेगळ्या कामांमुळे सोबतच बँकेत सेवक किंवा कर्मचारी यांच्याजवळ ती यादी ठेवण्यात आली आहे. यादीत नाव शोधणे, कधी ते नाव सापडत नाही, कधी याच नावाची सुरुवात श्री, श्रीमती अशा अक्षराने होत असल्याने ते सापडताना अडथळा येत आहे. यादीतील समाविष्ट नावे अशा प्रकारे शोधाशोध करावी लागत आहे. पण, अशावेळी एकच यादी आणि तीसुद्धा संबंधित बँकेच्या सेवक, कर्मचारी यांच्याजवळ असल्याने सेवानिवृत्तांना इकडून तिकडे जावे लागत आहे.
आधार कार्ड आणण्यासाठी पुन्हा होतेय धावपळ यंदा बँकेत पेन्शनधारकांना त्यांचे आधार कार्ड झेरॉक्स देऊन यादीतील अनुक्रमांक टाकावा लागत आहे. अनुक्रमांक आणि नाव शोधण्यात वेळ जातोय. अनेक पेन्शनधारकांना आधार कार्ड सोबत द्यायचे आहे, याची कल्पनाच नसल्याने आधार कार्ड आणण्यास किंवा झेरॉक्ससाठी त्यांना पायपीट करावी लागत आहे, विशेषतः अनेक सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक यांना घरातील सदस्य सोबत नसतात. कधी आधार कार्ड सोबत नसते, यास सामोरे जावे लागत असल्याची कैफियत ज्येष्ठ नागरिकांनी मांडली.
जिल्ह्यात साडेबारा हजार पेन्शनधारकभंडारा शहरासह जिल्ह्यात पेन्शनधारकांची संख्या जवळपास सात हजारहून अधिक आहे. सर्वांची पेन्शन जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयामार्फत बिल अदा केल्यानंतर संबंधित पेन्शनधारकांच्या नमूद केलेल्या बँक खात्यात दर महिन्याला जमा होते.