राष्ट्रीय महामार्ग गेलेल्या गावांमध्ये गावकऱ्यांच्या सुविधेसाठी सर्व्हिस राेड तयार करण्यात आला आहे. मात्र या रस्त्यांची गत काही वर्षांपासून दुरुस्तीच करण्यात आली नाही. भंडारा तालुक्यातील बेला, शहापूर, ठाणा, खरबी नाका, भीलेवाडा, मुरमाडी, लाखनी, मानेगाव येथील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे गावकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. महामार्गावर अवजड वाहनांची भरधाव वाहतूक हाेत असल्याने छाेटी वाहने व दुचाकी या सर्व्हिस रस्त्यावरून जातात. त्यामुळे गावकऱ्यांना जपून रस्ता पार करावा लागत आहे.
शहापूर येथील सर्व्हिस रस्ता पूर्णत: खचला असून येथे वाहनधारकांना कसरत करावी लागते. साईड पट्ट्यांमुळे दुचाकीधारक जीव धाेक्यात घालून प्रवास करतात. महामार्गावरील धुळीच्या लाेटामुळेही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्व्हिस रस्त्यासाेबतच महामार्गावरील खड्डेही अपघातास कारणीभूत ठरत आहे. या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी लक्ष देण्याची गरज आहे. तत्काळ दुरुस्ती न केल्यास आंदाेलनाचा इशारा शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा खरबीचे उपसरपंच संजय आकरे यांनी दिला आहे.