भंडारा : कोरोना काळात सातत्याने रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर शाळेतली मुलं पडतात, झडतात, जखमी होतात, अशा मुलांना तत्काळ सेवा पुरवणारे, गत पंधरा वर्षांपासून व्याधीग्रस्त, अपघातग्रस्त मुलांना वैद्यकीय सेवा देऊन खरीखुरी जनसेवा करणारे डॉक्टर हेच खरे मुलांचे रक्षक आहेत. डॉक्टरांच्या सेवेमुळे समाजातील घटक निर्भयपणे काम करू शकतो, असे प्रतिपादन प्राचार्या केशर बोकडे यांनी केले. डॉक्टर्स डेच्या निमित्ताने स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालयाकडून वैद्यकीय सेवा देणारे डॉ. अभय साखरकर यांचा सत्कार करून त्यांना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्या बोलत होत्या.
विद्यालयाच्या प्राचार्या केशर बोकडे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. साखरकर यांचा सन्मान केला. नाविन्यपूर्ण उपक्रम विभागाकडून हा कार्यक्रम घेण्यात आला. समाजाला सेवा पुरवणारे अनेक घटक असतात, त्यातला महत्त्वाचा घटक डॉक्टर आहे. शाळेतल्या मुलांच्या आरोग्यविषयक समस्येत मुलांना खरे पाठबळ डॉक्टरांच्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे मिळते. कोरोनाच्या भययुक्त वातावरणात रुग्णांना भयातून बाहेर काढण्याचे सामर्थ्य प्रदान करून भयमुक्त जगण्याचे अभय डॉक्टरच देतात. त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त करायलाच हव्यात, आभार व्यक्त करून गौरव करायलाच हवा, असे प्रतिपादन प्राचार्या केशर बोकडे यांनी केले. शाळेने केलेल्या सन्मानाबद्दल डॉ. अभय साखरकर यांनी आभार व्यक्त केले. प्रारंभी नाविन्यपूर्ण उपक्रम विभागप्रमुख स्मिता गालफाडे यांनी डॅाक्टर्स डेच्या आयोजनाची संकल्पना व औचित्य स्पष्ट केले.
डॉक्टरांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.