लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आरोग्य विभाग हा सर्व विभागांचा आत्मा असून या विभागाला सर्वांची गरज आहे. सध्या जिल्ह्यात आरोग्य विभागाचे काम चांगले आहे. परंतु आरोग्याची सेवा त्याहून अधिक चांगली देण्यासाठी स्वच्छता व आरोग्य सेवेचे ध्येय निश्चित करून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघटितपणे कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित करण्यात स्वच्छता पंधरवडा, आरोग्य दिन व उष्माघात कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, ज्ञानेश्वर सपाटे, सुधाकर आडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रविशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कमलेश भंडारी, मुख्य वित्त व लेखाधिकारी अ.बा. मातकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले, सर्वांत पहिले प्रत्येक विभागाला आपले ध्येय कळले पाहिजे. ते कळले नाही तर आपण ध्येयाकडे वाटचाल करू शकत नाही, संघटितपणे काम करू शकत नाही. त्यामुळे विशिष्ट ध्येय निश्चित करून संघटितपणे ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करण्याची गरज आहे. स्वच्छता ते संकल्प सिध्दी या सारख्या कार्यक्रमाची व्यक्तीगत पातळीपासून सुरूवात झाली पाहिजे. प्रत्येक विभागाचा एकमेकांशी समन्वय असला पाहिजे. अधिकारी कर्मचाºयांनी एकमेकांशी बोलले पाहिजे. माहितीचे आदान प्रदान केले पाहिजे. अधिकारी व कर्मचाºयांमध्ये पदांचे कवच निर्माण होता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले.मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी म्हणाले, स्वच्छता पंधरवडा, स्वच्छता से संकल्प सिध्दी या कार्यक्रमाची सुरूवात शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून झाली. देशभरात स्वच्छतेचे काम अग्रक्रमावर सुरू आहे. जिल्ह्याचा स्वच्छता विभाग यावर चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. भंडारा जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. देशभरात भंडारा जिल्हा हा शौचालय बांधकाम, त्याचा उपयोग, केंद्र शासनाच्या साईटवर शंभर टक्के फोटो अपलोड करणे अशा विविध स्तरावर जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर आहे. आरोग्य विभाग स्वच्छता पंधरवडा राबवित असून सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे, ही आनंदाची बाब आहे. प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी यांनी स्वच्छता पंधरवडा, जागतिक आरोग्य दिवसाचे महत्त्व व उष्माघात याविषयी माहिती दिली. संचालन वैद्यकीय अधिकारी डॉ.शांतीदास लुंगे यांनी तर आभार प्रदर्शन साथरोग वैद्यकीय अधिकारी आर.डी.कापगते यांनी केले.वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरवअनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºया वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्त्व करंडक स्पर्धेत वरिष्ठ व कनिष्ठ गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हाभरात ग्रामस्तरावर हागणदारीची जागा रासेयो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. महाविद्यालयीन रासेयो विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.उष्माघाताबाबत मार्गदर्शनस्वच्छता पंधरवडा व जागतिक आरोग्य दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून कार्यक्रमाच्या शेवटी उष्माघात कृती आराखडयाबाबत आरोग्य विभागाच्यावतीने कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी जागतिक आरोग्य दिन व त्या दिवसाचे महत्त्व याविषयी डॉ.माधुरी माथुरकर यांनी, स्वच्छता पंधरवडा याविषयी डॉ.आर.डी. कापगते यांनी उष्माघात याविषयी डॉ.श्रीकांत आंबेकर यांनी मार्गदर्शन केले.
स्वच्छता व आरोग्य सेवेसाठी ध्येय निश्चित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 1:35 AM
आरोग्य विभाग हा सर्व विभागांचा आत्मा असून या विभागाला सर्वांची गरज आहे. सध्या जिल्ह्यात आरोग्य विभागाचे काम चांगले आहे. परंतु आरोग्याची सेवा त्याहून अधिक चांगली देण्यासाठी स्वच्छता व आरोग्य सेवेचे ध्येय निश्चित करून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघटितपणे कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.
ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : स्वच्छता पंधरवडा, उष्माघातासंबंधी कार्यशाळा