इंद्रपाल कटकवार
भंडारा : तुमसर येथे नऊ वर्षांपूर्वी सराफा व्यावसायिक, त्याची पत्नी व मुलगा यांच्या हत्येप्रकरणी भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. हा निर्णय दुपारी तीन वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांनी सुनावला. हत्याकांड्याच्या तब्बल नऊ वर्षापर्यंत नंतर या प्रकरणात आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांमध्ये शहानवाज उर्फ बाबू सत्तार शेख (३२), महेश सुभाष आगासे (३५), सलीम नजीम खा पठाण (३४), राहुल गोपीचंद पडोळे (३२), मोहम्मद अफरोज उर्फ सोहेल युसुफ शेख (३४), शेख रफिक शेख रहमान (४५) व केसरी मनोहर ढोले (३४) अशी नावे आहेत.
२५ फेब्रुवारी २०१४ च्या मध्यरात्रीच्या सुमारास तुमसर येथील प्रतिष्ठित सराफा व्यवसायिक संजय चिमणलाल रानपुरा (सोनी)(४७) त्यांची पत्नी पूनम संजय रानपुरा (४३) व त्यांचा मुलगा दुर्मिळ संजय रानपुरा (१२) याची यांची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर अवघ्या २४ तासात तुमसर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. यापैकी एकाला मुंबईतून अटक करण्यात आली होती. हत्येनंतर आरोपीनी ८.३ किलो सोने चांदीचे दागिने व ३९ लक्ष रुपयांची रोख ही चोरून नेली होती. गळा आवळून खून केल्यानंतर लूटपाटीच्या घटनेला अंजाम देण्यात आला होता.