दयाल भोवते
लाखांदूर (भंडारा) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध होण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा उघडल्या आहेत. लाखांदूर तालुक्यातील एका शाळेत वर्ग सात व वर्गखोल्या पाच असल्याने शाळेच्या पडवीत वर्ग भरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत उघडकीस आला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध होण्यासाठी शासनाने ठिकठिकाणी शाळा उघडल्या आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत मांढळ येथे वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावात पहिली ते सातवीपर्यंतच शाळा असल्याने गावातील तब्बल ३३० विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आठ शिक्षकांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
या शाळेत सध्या नऊ वर्ग खोल्या आहेत. यापैकी एका खोलीत शासनाने दिलेले नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र असून, दोन खोल्या धोकादायक असल्याने शाळा समितीने त्यांना निर्लेखित केल्या आहेत. त्यांचा अहवाल शिक्षण विभागाला देखील दिला आहे. उर्वरित पाच खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे गिरविले जात आहेत. शाळेत वर्ग सात असून, केवळ पाच वर्गखोल्या असल्याने शाळेच्या पडवीत दोन वर्ग भरविले जात आहेत. अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा पहिला व तिसरा वर्ग शाळेच्या पडवीत भरविला जात असल्याची माहिती आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध होण्यासाठी वर्गखोल्या मंजूर करण्याची मागणी पालकांसह गावकऱ्यांनी केली आहे.
अन्य गावांतील विद्यार्थी येतात शाळेत
मांढळनजीक असलेल्या दांडेगाव व गुंजेपार येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. दांडेगाव व गुंजेपार येथील विद्यार्थी पाचवीपासूनचे शिक्षण घेण्यासाठी मांढळ येथे येतात. दोन्ही गावांतील जवळपास ४० ते ५० विद्यार्थी नियमित शाळेत ये-जा करीत आहेत.
शौचालयासाठी घरचा रस्ता
तब्बल ३३० पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत केवळ एकच शौचालय आहे. शौचालयाची इमारत खूप जुनी असल्याने येथील दरवाजे उघडत नसून याचा वापरच करता येत नाही. विद्यार्थ्यांना शालेय वेळात शौचालयासाठी घरचा रस्ता धरावा लागत असतो.