छावा संग्राम परिषद व मंदिर पंचकमेटीचा उपक्रम अशोक पारधी पवनी पवनी नगरातील सामूहीक विवाह सोहळ्याची परंपरा गतवर्षापासून सुरु ठेवण्यासाठी छावा संग्राम परिषद व बेलघाटा व बस्तरवारी वॉर्डातील मंदिर पंचकमेटीने एकसंघ होऊन विवाह सोहळा आयोजित केला. हजारो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत सात शेतकरी कन्या विवाहबद्ध झाल्या. या स्तुत्य उपक्रमासाठी उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.बेलघाटा वॉर्डातील संताजी मंगल कार्यालयाचेप्रांगणात आयोजित या सामूहीक विवाह सोहळ्याचे उद्घाटन नगराध्यक्ष पुनम काटेखाये यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये होते. याप्रसंगी आमदार अॅड.रामचंद्र अवसरे, माजी नगराध्यक्ष डॉ.प्रकाश देशकर, पालिकेचे उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर, सभापती नरेश तलमले, सभापती अनुराधा बुराडे, नगरसेवक प्रियांका जुमळे, निर्मला तलमले, शहजादा बेग, माजी उपाध्यक्ष धर्मेंद्र नंदरधने, दुधराम कळंबे, आझाद शेतकरी संघटनेचे किशोर पंचभाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.अनिल धकाते, नगरसेवक शोभना गौरशेट्टीवार, डॉ.भागवत आकरे, डी.आर. पडोळे, हिरामण जुमळे, पंकज रेवतकर, पुरुषोत्तम तलमले उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्य संयोजक राजेश तलमले यांनी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करून शेतकरी कन्यांचे लग्न लावून देण्याची परंपरा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आमदार रामचंद्र अवसरे यांनी नवदाम्पत्यांना शिलाई मशिन भेट देणार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ.प्रकाश देशकर, विलास काटेखाये, धर्मेंद्र नंदरधने यांनी मार्गदर्शन केले. संचालन नामदेव सुरकर यांनी तर आभार ज्ञानेश्वर वाघमारे यांनी मानले.
सात शेतकरी कन्या विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2017 12:22 AM