तुमसर : नगर परिषद तुमसरच्या प्रभाग क्र. ३ येथील हनुमान नगरातील सांडपाण्याच्या समस्येचे निवारण करण्याकरिता प्रभागवासीयांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम यांच्या नेतृत्वात नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा स्वच्छता व आरोग्य विभागाचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये प्रभागातील नाल्यांमधील दूषित सांडपाणी तिथेच जमा राहत असल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. दूषित सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे डासांच्या संख्येत वाढ झाली असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याबाबत प्रभागातील लोकांनी नगरसेवकांना वारंवार तक्रार करूनसुद्धा ते लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांच्या हिताचे कार्य करण्यात यावे. नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे लोकांना असह्य त्रास होत असून, त्यांना प्रथम प्राधान्य देऊन समस्यांचे समाधान करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या वेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम, उपतालुका प्रमुख संतोष पाठक, निखिल कटारे, गिरीश भुरे, मुकुंद निखाडे, मोरेश्वर पाटील, योगिता बडवाईक, पुष्पक मानकर, राकेश भोंगाडे, रोहित किनेकर, श्रेयस गभणे, तुषार लांजेवार, संदेश मते, निशांत ताजने, कोमल लांजेवार यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.