प्रल्हाद हुमणे
फाोटो १४ लोक १९ के
जवाहरनगर : क्रांतिकारी विचारांचा इतिहास सांगणारा शहापूर येथील ऐतिहासिक भीम मेळावा म्हणजे आंबेडकरी बांधवांचा वारसा होय. दरवर्षी १६ जानेवारीला आयोजित होणाऱ्या या भीम मेळाव्यामागे रोमहर्षक इतिहास असून दरवर्षी या भीम मेळाव्याचे आयोजन केले जाते. शनिवार १६ जानेवारी रोजी आयोजित या मेळाव्याला परिसरातील नव्हे तर, जिल्ह्यातील भीमसागर लोटणार आहे. भंडारा तालुक्यातील शहापूर गावाची नोंद आंबेडकरी इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली गेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९४४ साली शहापूरवासीयांनी मेळाव्याची सुरुवात केली. तेव्हापासून म्हणजे तब्बल ७६ वर्षापासून दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येतात. मेळाव्याचे संयोजक मोरेश्वर गजभिये सांगतात, भीम मेळाव्याचा इतिहास रोमहर्षक आणि क्रांतिकारक आहे. १९३८ साली शहापूर गावात रोगाचे थैमान घातले होते. त्याला आळा घालण्यासाठी अज्ञानातून एक साधूबाबाला बोलाविले. सूचनेनुसार हवनकुंड बांधण्याचे ठरले. दिवंगत गंगाराम रंगारी यांनी हवनकुंड बांधून दिले. हवनाच्या वेळी रंगारी यांनी हवनकुंडाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. परंतु अस्पृश्याच्या हाताने हवनकुंड बाटेल आणि कोप होईल म्हणून त्यांना अडविण्यात आले. या प्रकाराने रंगारी व्यथित झाले. बाबासाहेबांच्या विचाराचा त्यांच्यावर पगडा होता. त्यांच्यातील स्वाभिमान जागा झाला. आत्माराम गजभिये, जयराम गजभिये। कवडू खोबरागडे ही मंडळी रंगारी यांच्या मदतीला धावून आले. गावात समाज बांधवांची सभा घेतली आणि स्वतंत्र मंदिर बांधण्याची कल्पना आली. लोकवर्गणी आणि श्रमदानातून तेथे मंदिर उभे झाले . विश्वनाथ मंदिर असे त्याचे नामकरण झाले. मंदिराला लागूनच कुटुंबातील प्रत्येक दाम्पत्यानी श्रमदानातून तेथे स्वतंत्र विहीर खोदली. हीच प्रेरणा घेऊन परिसरातील गावात अस्पृश्यांसाठी स्वतंत्र विहिरी तयार झाल्या असे मोरेश्वर गजभिये यांनी सांगितले.
शहापूर हे परिसरातील मोठे गावं परिसरातील आंबेडकरी जनतेला शहापूरवाशीयांकडून मोठ्या अपेक्षा. परिसरातील आंबेडकरी जनतेला एकत्र आणून बाबासाहेबांच्या कार्याची ओळख पटवून देण्यासाठी एक कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले. १४ जानेवारीला भीमसागर या नावाने कार्यक्रम घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार १४ जानेवारी१९४४ रोजी सर्वप्रथम भीमसागर कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर दरवर्षी १४ जानेवारीला या कार्यक्रमाचे आयोजन होऊ लागले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे धम्मदीक्षा घेतली . त्यानंतर मंदिरातील मूर्ती काढून तेथे तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसविण्यात आली. आणि मंदिराचा चेहरामोहरा बदलून त्याचे बौद्ध विहार असे नामकरण करण्यात आले. दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. याही वर्षी शनिवार १६ जानेवारी रोजी कोविड १९ चे पालन करून सकाळ पासून सायंकाळ पर्यंत समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि रात्री गीत गायनाचे आयोजन करण्यात आले आहे.
बॉक्स
शहापूर येथे् बाबासाहेबांचे स्वागत
१९५४ साली लोकसभेची पोटनिवडणूक होती . या निवडणुकीच्या निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंडारा येथे जात होते. वाटेत शहापूर येथे कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवून जल्लोषात स्वागत केले. बाबासाहेबांचा शहापूरला लागलेला पदस्पर्श या भीममेळाव्यासाठी महत्त्वाची खूणगाठ ठरली. आजही बाबासाहेबांच्या आठवणींना प्रत्येक जण उजाळा देत असतो.