लाखांदूर (भंडारा) : तीन जिल्ह्यांत बारा जणांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचा फौजफाटा बुधवारपासून तालुक्यातील इंदोरा जंगलात तळ ठोकून आहे. जंगलात ठिकठिकाणी मचान उभारून खडा पहारा सुरू आहे. वाघ टप्प्यात यावा म्हणून जंगलात वगार बांधून ठेवली. बुधवारी रात्री वाघ आला, वगारीला घेऊनही गेला. मात्र रात्रीची वेळ असल्याने नियमानुसार बेशुद्धीचे इंजेक्शन मारता आले नाही. टप्प्यात वाघ येऊनही शार्पशूटर बघतच राहिले. डोळ्यांदेखत वाघ आला आणि निघूनही गेला.
तालुक्यातील इंदोरा जंगलात विनय खगेन मंडल (४५) रा. अरुणनगर, ता. मोरगाव अर्जुनी हा मासेमारीसाठी तलावावर गेला असता सीटी-१ वाघाने त्याला ठार मारले. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वनविभागासह तालुक्यात एकच खळबळ उडाली. वाघाला जेरबंद करण्यासाठी तीन जिल्ह्यांतील शीघ्रकृती दलाचे पथक आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पथक दाखल झाले. त्यात प्रत्येक पथकात दोन शार्पशूटरचाही समावेश आहे.
जंगलात ठिकठिकाणी मचान उभारून ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. मचानवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासोबत शार्पशूटरही वाघावर नजर ठेवून आहेत. वाघाला आकर्षित करण्यासाठी जंगलात वगर बांधण्यात आली. वाघ टप्प्यात आली की, त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन मारून जेरबंद करण्याचा प्रयत्नात सर्व वन कार्मचारी होते. मात्र बधवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास वाघ आला. वनविभागाने बांधून ठेवलेली जिवंत वगार पळवून नेली. ही घटना मचानावरील शार्पशूटर यांच्या दृष्टीस पडला. परंतु रात्रीची वेळ असल्याने शासन निर्देशानुसार वाघाला बेशुद्धीचे इंजेक्शन मारता आले नाही अशी माहिती आहे. गुरुवारी दिवसभर या प्रकारची चर्चा तालुक्यात होती. आता वाघ कधी जेरबंद होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाघाला जेरबंद करण्याच्या हालचालींना वेग
टप्प्यात येऊनही वाघाला बेशुद्ध करता आले नसल्याने गुरुवारी पुन्हा वाघाला जेरबंद करण्याची मोहीम वेगाने सुरू करण्यात आली. उपवनसंरक्षक राहुल गवई, सहायक वनसंरक्षक रोशन राठोड, लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित, क्षेत्र सहायक आर. आर. दुनेदार, वनरक्षक एस. जी. खंडागळे, जी. डी. हत्ते, आर. एस. भोगे, एम. एस. चांदेवार, आर. ए. मेश्राम, केवट यांच्यासह मानद वन्यजीव रक्षक आदी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वात माेहीम गुरुवारी दिवसभर राबविण्यात आली.