आॅनलाईन लोकमतभंडारा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धा सन २०१७-१८ ची जिल्हास्तरीय तपासणी जिल्हा परिषदेच्यावतीने पूर्ण करून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हास्तरीय स्पर्धेचे निकाल घोषीत करण्यात आले.विजेत्या ग्रामपंचायतीमध्ये लाखनी पंचायत समिती अंतर्गत शिवणी ग्रामपंचायत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली असून ग्रामपंचायत पालडोंगरी द्वितीय तर ग्रामपंचायत रेंगेपार (कोहळी) व तृतीय क्रमांकाची ठरली आहे. या विजेत्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे पाच लाख, तीन लाख व दोन लाख रूपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष पुरस्कारासाठी विरली (बुज.), रावणवाडी व शिवणीबांध या ग्रामपंचायती विजेत्या ठरल्या आहेत.सन २०१७-१८ या वर्षात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी तालुकास्तरावर प्रथम व द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती.निवड करण्यात आलेल्या तिन्ही ग्रामपंचायतींपैकी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या ग्रामपंचायती या जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता पात्र ठरल्या होत्या. त्यामध्ये भंडारा पंचायत समिती अंतर्गत रावणवाडी व दाभा, मोहाडी पंचायत समिती अंतर्गत पालडोंगरी व नेरी, तुमसर पंचायत समिती अंतर्गत सितेपार व उमरवाडा, लाखनी पंचायत समिती अंतर्गत शिवणी व रेंगेपार (कोहळी), साकोली पंचायत समिती अंतर्गत वडद व शिवणीबांध, लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत आसोला, व विरली (बुज) तर पवनी पंचायत समिती अंतर्गत सावरला व भावड या ग्राम पंचायतींचा समावेश होता.सदर ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय तपासणी २२ मार्च रोी जिल्हास्तरीय चमूच्यावतीने पूर्ण करण्यात आली. शुक्रवारला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय स्पर्धेचे निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) ज्ञानेश्वर सपाटे यांच्या नेतृत्वात घोषित करण्यात आले.विशेष पुरस्कारासाठी विरली, रावणवाडी व शिवणीबांध या ग्रामपंचायती पात्र ठरल्या असून विशेष पुरस्कारात कुटूंब कल्याण या विषयात स्व.आबासाहेब खेडकर या पुररस्कारासाठी लाखांदूर तालुक्यातील विरली ग्रामपंचायत, पाणी गुणवत्ता, पिण्याचे पाणी व सांडपाणी या विषयात स्व.वसंतराव नाईक पुरस्कारासाठी ग्रामपंचायत रावणवाडी तर सामाजिक एकता विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारासाठी शिवणीबांध ग्रामपंचायत मानकरी ठरली आहे.
शिवणी, पालडोंगरी, रेंगेपार ग्रा.पं. ठरल्या विजेत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:37 PM
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धा सन २०१७-१८ ची जिल्हास्तरीय तपासणी जिल्हा परिषदेच्यावतीने पूर्ण करून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हास्तरीय स्पर्धेचे निकाल घोषीत करण्यात आले.
ठळक मुद्देग्रामस्वच्छता स्पर्धेचा निकाल घोषित : विशेष पुरस्कारासाठी विरली, रावणवाडी, शिवणीबांधची निवड