भंडारा : शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी बनावट प्रमाणपत्रे सादर करीत २०१५ साली पुरस्कार मिळविणाऱ्या येथील क्रीडा शिक्षकावर भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन गोपाळराव दाढी (वय ५०) असे त्याचे नाव आहे. या प्रकारानंतर क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
राजेंद्र शंकरराव भांडारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली. भांडारकर यांना देखील यंदा क्रीडा संघटकाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला हे विशेष. विविध खेळांच्या संघटनांमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत मोहन दाढी नूतन कन्या शाळेत कार्यरत आहे. महाराष्टÑ शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारासाठी २०१२-१३ मध्ये मोहन दाढी याने प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावात आपण जिल्हा तलवारबाजी असोसिएशन कार्यकारणीत असल्याचे प्रमाणपत्र जोडले. तसेच जिल्हा महिला क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्षपदाचे लेटरपॅड प्रस्तावाला जोडले होते. मात्र, सदर प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार दुसरे क्रीडा शिक्षक राजेंद्र शंकरराव भांडारकर यांनी केली होती. यासाठी त्यांनी २०१२-१३ पासून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर चौकशीत जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे पुढे आले. तसेच लेटरपॅडही बनावट असल्याचे दिसून आले. त्यानंतर कलम ४१९, ४६५, ४६८, ४७१, ४७३ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.