यावेळी सरपंच पंकज रामटेके पालांदूर, सरपंच केसव बडोले कवलेवाडा, उपसरपंच स्वप्निल खंडाईत, ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत, माजी जि.प. सदस्य भरत खंडाईत, तथा शिवजयंती उत्सव समितीचे युवा कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
शौर्य, धौर्य व औदार्याचे प्रतीक राजे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला मान्यवरांनी अर्पण केले. गावातील इतरांनी व उपस्थित युवकांनी पुष्प वाहत शिवाजी महाराजांना विनम्रपणे नमन केले. राष्ट्रसंत तुकडोजी, गाडगेबाबा यांच्या पूर्णकृती पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. ‘जय शिवाजी जय भवानी’ असा जयघोष करण्यात आला. संगीत शिक्षक भास्कर पिंपळे यांनी आपल्या शाही दणकट आवाजात राजे शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोवाड्यातील काही विशेष भागात साक्षात शिवाजी महाराज उभा केला.
दामाजी खंडाईत यांनी शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रकाश टाकीत बुद्धिवादी, वास्तववादी, प्रयत्नवादी, द्रष्टा, शूर, पराक्रमी, स्वराज्यप्रेमी, सर्वधर्म समभाव, शेतकऱ्याचे कैवारी असे विविध विशेषणांनी त्यांचा गुणगौरव केला. त्यांच्या सैन्यातील अठरापगड जातीतील मावळ्यांचे वर्णन करीत सैन्यप्रती असलेला विश्वास राजकारण्यांना प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. हरिश्चंद्र लाडे गुरुजी यांनीही शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश पुरविला. त्यांच्या लोकप्रियतेची व व्यक्तिगत शरीर संपत्तीची त्यांनी प्रशंसा केली.
पालांदूर कवलेवाडा व मेगापूरच्या सौजन्याने गत कित्येक वर्षांपासून पालांदूर येथे शिवजयंती उत्सव पार पाडला जातो. मोठ्या थाटामाटात घोड्याच्या सवारीवर शिवाजी बसवून तीनही गावांना प्रदक्षिणा घातली जाते. शेकडो मावळ्यांची फौज शिवाजीच्या मागे तंत्रशुद्ध आवेशात सैनिकांची कूच गावकऱ्यांना मोहक ठरते. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने शासनाने पुरविलेल्या नियमांचे पालन करीत अत्यंत साध्या पद्धतीत राजे शिवाजींना विनम्रपणे अभिवादन करण्यात आले. शेकडो शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी भव्य महाप्रसादाचे आयोजन बाजार चौकात पार पाडले. कोरोनाच्या सावटातही शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची छाप कार्यक्रमात लपून राहिली नाही. पालांदूर कवलेवाडा मेंगापूर येथील तरुणांच्या सहकार्याने वार्षिक कार्यक्रम उत्साही वातावरणात नेहमीच पार पाडले जातात. शिवजयंती हा कार्यक्रम पालांदूरच्या इतिहासातील कौतुकास्पद ठरला. संचालन संगीत शिक्षक भास्कर पिंपळे गुरुजी यांनी आपल्या मधुर वाणीतून सांभाळले. सगळ्यांना महाप्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.