मोहन भोयर
भंडारा: मध्यप्रदेशातील धानाची नियमबाह्य तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आयात सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. तालुक्यातील सीमावर्ती गावात दलालांची टोळी सक्रिय असून मध्य प्रदेशातील शेतकऱ्याकडून प्रति क्विंटल १,२०० रुपये दराने धान खरेदी करीत असल्याची माहिती आहे. मध्यप्रदेशातील कमी किमतीत खरेदी केलेला धान महराष्ट्रातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या सातबारावर विकला जात आहे.
तुमसर प्रमुख धान उत्पादक तालुका असून या तालुक्याच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात उन्हाळी धानाची मोठी लागवड करण्यात आली होती. तेथील शेतकऱ्यांना मोठे उत्पादन झाले. बालाघाट जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी सध्या धानाची विक्री तुमसर तालुक्यात दलालांना करीत असल्याची माहिती आहे. प्रति क्विंटल बाराशे रुपये असा भाव हे दलाल त्यांना देत आहेत. नगदी पैसा देत असल्याने तेथील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपले धान या दलालांना विक्री करीत असल्याची माहिती आहे.
तुमसर तालुक्यातील सीमावर्ती गावात मध्य प्रदेशातील लहान मोठ्या प्रमाणात आयात होत असून येथून ते दुसरीकडे पाठविण्यात येत आहे. राज्यातील शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर प्रतिक्विंटल १,९४० रुपयांचा भाव आहे. दलाल शेतकऱ्यांच्या सातबारावर धानाची विक्री करत असल्याची माहिती आहे.
धान खरेदी बंदचा फटका
मध्य प्रदेश व महाराष्ट्रात सध्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील लिंक बंद करण्यात आली आहे. तुमसर तालुक्यासह जिल्ह्यातील इतर शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र बंद आहेत. त्यामुळे धान विक्री कुठे करावी असा प्रश्न आहे. दुसरीकडे दलाल मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी करत आहेत. हा धान ते स्वत: भरडाई करणार की, शेतकऱ्यांच्या नावावर विकणार हा प्रश्न आहे.
सीमावर्ती गावांत मोठाले गोदाम
तुमसर तालुक्यातील सीमावर्ती काही गावांत मोठे गोडाऊन बांधकाम करण्यात आले आहेत. त्या गोदामाचा उपयोग धान साठवणुकीसाठी करण्यात येत आहे. धानाशिवाय गूळ, मोहफुल, इत्यादींची आयातही करण्यात येत असल्याची माहिती आहे. राज्याच्या सीमा खुल्या असल्यामुळे बेधडक वस्तूची आयात येथे होत आहे. प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष आहे. या प्रक्रियेत मोठ्या व्यक्तींचा समावेश असल्यामुळे त्याविरुद्ध कोणी बोलायला तयार नाही.