वरठी : आर्थिक व्यवहाराचे डिजिटल स्वरूप सोपे असल्याने अनेकांनी याकडे आपला कल वाढवला आहे. गावागावांत खासगी केंद्रातून अधिकृत व्यवहार केले जातात. ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या दुकानाची व्याप्ती हेरून ऑनलाइन गंडावणाऱ्यांनी दुकानदारांना लुबाडण्याची शक्कल शोधून काढली आहे. दुकानदारांना गंडवण्यासाठी ग्राहक पाठवून पैसे ट्रान्सफर करायला लावतात. ऑनलाइन व्यवहार रखडवून नवी लिंक देण्याच्या नावावर लुबाडणुकीचा नवीन प्रकार सुरू झाला आहे. यासाठी अनोळखी व्यक्तीचा वापर केला जात असून, कधी कधी परिचितांना आमिष देऊन हेरण्यात येत आहे.
ऑनलाइन व्यवहाराच्या डिजिटल स्वरूपाची व्याप्ती वाढल्याने खिसे रिकामे झाले. आर्थिक व्यवहार हातातील बोटावर करणे सोपे झाले आहे. शासकीय योजनांपासून ते सामान्य व्यवहार ऑनलाइन होत असल्याने ऑनलाइन व्यवहार करणारी दुकाने गल्लोगल्ली झाली आहेत. या दुकानांमार्फत मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पैसे पाठविणे व काढणे यांसारखे व्यवहार होतात. ऑनलाइन व्यवहारात असलेल्या दुकानदारांना लक्ष्य केले जात आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या कामात मातब्बरांनी दुकानदारांना लुबाडण्याचे तंत्र शोधून काढले आहे.
ऑनलाइन आर्थिक व्यवहार हे मोबाइल क्रमांकाने सहज करता येतात. यासाठी अधिकृत अनेक ॲप आहेत. लुबाडण्यासाठी ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या दुकानदाराकडे ग्राहक पाठविण्यात येतात. ते पैसे पाठविण्यासाठी एक मोबाइल नंबर सांगतात. अनेकदा प्रयत्न करूनही आर्थिक व्यवहार तडीस जात नाही. अशा वेळी समोरच्या व्यक्तीचा फोन येतो. ऑनलाइन गडबड असल्याचे कारण सांगून दुकानदारांना मोबाइल नंबर मागतो. मोबाइल नंबर देताच त्यावर लिंक पाठवून ओटीपी विचारणा करण्यात येते. तो ओटीपी दिला की दुकानदारांची फसगत होते. अशा व्यवहारासाठी अनोळखी व्यक्तीचा वापर करण्यात येतो. ग्राहक म्हणून येणाऱ्यावर विश्वास ठेवून होणाऱ्या व्यवहारात फसण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.
बॉक्स
दुकानदारांनी सावध असावे
ग्राहक म्हणून आलेल्या व्यक्तीने पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. नेहमीप्रमाणे अधिकृत ॲपच्या माध्यमातून व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. पण, व्यवहार होत नव्हता. त्यानंतर माझ्या क्रमांकावर एक लिंक पाठवून त्या माध्यमातून येणाऱ्या ओटीपीनुसार व्यवहार करण्यास सांगण्यात आले. याबाबत शंका आल्याने माझी फसगत झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली. दिवसभरात शेकडो व्यवहार होतात आणि घाईगडबडीत चुका होऊ शकतात म्हणून दुकानदारांनी सावध राहावे, असे आवाहन सुविधा मोबाइलचे संचालक विवेक मोटघरे यांनी केले आहे.
ओटीपी म्हणजे परवानगी
ऑनलाइन व्यवहारात ओटीपी म्हणजेच परवानगी होय असे आहे. ग्राहक किंवा दुकानदार यांच्यामार्फत व्यवहार करताना एखाद्याने लिंक पाठवून आलेला ओटीपी मागितला तर देऊ नये. ओटीपी कुणी मागायचा आणि कुणी द्यावा हे समजणे आवश्यक आहे. आपण व्यवहार करीत असताना समोरच्याला ओटीपी देणे म्हणजे स्वतःचे नुकसान करून घेणे होय असे आहे.