जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्याने १३ एप्रिलपासून जिल्ह्यात संचारबंदी घोषित करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळात सुरू ठेवली जात होती. इतर सर्व व्यवसायाला प्रतिबंध करण्यात आला होता. मात्र, आता कोरोना संसर्ग हळूहळू कमी होऊ लागला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७.७ पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सोमवारी आदेश निर्गमित केला. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर सर्व एकेरी दुकाने (शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने वगळून) सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. चष्माची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील. मात्र, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने शुक्रवारी दुपारी २ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत (शनिवार, रविवार) पूर्णत: बंद राहतील. याठिकाणी मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतराची त्रिसूत्री अनिवार्य आहे. सर्व प्रकारच्या सामानाची घरपोच सेवा सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील. दुपारी ३ वाजेनंतर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या हालचालींना प्रतिबंध करण्यात येत आहे. वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कामे आणि घरपोच सेवेला मुभा राहील. दुपारी २ वाजेपर्यंत व्यवसायासाठी मुभा मिळाल्याने लघु आणि मध्यम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बॉक्स
शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थिती
जिल्ह्यातील शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळता) २५ टक्के उपस्थितीत सुरू राहतील. एखादे कार्यालय जास्त उपस्थिती ठेवू इच्छित असेल तर त्यांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
बॉक्स
कृषी निविष्ठा दुकाने सोमवारे ते शुक्रवार
खरीप हंगाम लवकरच सुरू होत असून शेतकऱ्यांची खरेदीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, कोरोना संसर्गामुळे दुकाने बंद होती. आता नवीन आदेशानुसार कृषी निविष्ठांची दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार आणि रविवार ही दुकाने पूर्णत: बंद राहणार आहेत.
बॉक्स
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना मज्जाव
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडाविषयक प्रदर्शने, शिबिरे, सभा, मेळावे, जत्रा, यात्रा, रॅली, धरणे, आंदोलने यांना प्रतिबंध राहणार आहे. कोरोना संसर्ग नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
बॉक्स
यांना प्रतिबंध कायम
बगीचे, खेळाचे मैदान, सिनेमागृह, नाट्यगृह, ऑडिटोरियम, व्हिडिओ गेम पार्लर, आठवडी बाजार, जलतरण केंद्र, व्यायामशाळा, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, उपाहारगृहे, हॉटेल, बार बंद राहतील. मात्र, पार्सल सुविधा, होम डिलिव्हरी सुविधा सुरू राहील. निवासी व्यवस्था असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये अतिथींसाठी रेस्टारंट सुरू ठेवता येईल; परंतु बाहेरील व्यक्तीला मज्जाव राहणार आहे. धार्मिकस्थळेही बंद राहणार असून नियमित होणाऱ्या विधी, पूजा व इतर धार्मिकस्थळावरील कार्यरत पुजारी, मौलाना कर्मचारी यांना करता येतील; परंतु त्यांचे लसीकरण आवश्यक आहे. हेअर सलून, ब्युटी पार्लर बंद राहतील.