इमारतीचेही मोठे नुकसान : दोन कोटींचे साहित्य जळून खाकपवनी / आसगाव (चौ.) : येथील नौकरकर हार्डवेअर अँड इलेक्ट्रीकल्स तसेच तिरुपती कृषी केंद्रास रात्री १ वाजताचे सुमारास उच्च दाब विद्युत प्रवाहामुळे लागलेल्या भीषण आगीत दोन कोटीपेक्षा अधिक साहित्य जळून खाक झाले अशी तक्रार दुकानाचे प्रोपायटर अनिल महादेव नौकरकर यांनी पवनी पोलीस ठाण्यात दिली आहे.२४ वर्षापासून आसगाव येथे नौकरकर यांचे दुकान अस्तित्वात आहे. त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या चार गाळ्यात इलेक्ट्रीकल्स, हार्डवेअर व कृषी उपयोगाचे साहित्य विक्रीसाठी भरून ठेवलेले होते. रविवारी रात्री दुकानाला आग लागल्याचे सांगितले. तात्काळ ग्रामस्थांना मदतीला घेवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अडीच ते तीन तासात आगीवर नियंत्रण करण्यात यश आले. परंतु दुकानातील पेस्टीसाईड, फर्टीलायझर, बि बियाणे, इलेक्ट्रीक मोटार पंप, पाईप, पेंट, डिस्टेंपर मशीन, नायलॉन, कृषी अवजारे, टेबल व सिलींग फॅन्स, दुकानात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य साहित्य जळून खाक झालेले होते. गाळे असलेल्या इमारतीचे फार नुकसान झालेले आहे. आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी केली आहे. आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)अग्निशमन वाहन कुलूपबंद पवनी नगरपरिषदेकडे अग्निशमन वाहन खरेदी करून कुलूपबंद ठेवण्यात आलेले आहे. प्रशिक्षित वाहन चालक नियुक्त करण्यास जिल्हा प्रशासनाने मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे अग्निशमन वाहने बंद अवस्थेत पडलेले आहे. पवनी नगरात व परिसरात आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. परंतु जिल्हा प्रशासन व नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्षामुळे अग्नीशमन वाहन निरुपयोगी ठरत आहेत. नागरिकांना तातडीची मदत होवू शकत नाही आहे.
उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहामुळे दुकानाला आग
By admin | Published: April 18, 2017 12:36 AM