लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऑरेज झोनसाठी शासनाने काही सवलत जाहीर केल्यानंतर सोमवारी भंडारा शहरातील रस्त्यावर नागरिक आणि वाहनांची मोठी गर्दी झाली. जिल्हा प्रशासनाचे आदेश नसताना अनेक दुकाने सकाळी १० वाजतापासून उघडली. यामुळे शहरात मोठा संभ्रम दिसत होता.भंडारा जिल्ह्यात एक व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळल्याने जिल्हा ऑरेज झोनमध्ये आहे. त्यातच शासनाने ग्रीन व ऑरेज झोन साठी सवलती जाहीर केल्या. मात्र स्थानिक प्रशासनाने सोमवारपर्यंत कोणताच आदेश काढला नव्हता. परंतु गत ४० दिवसापासून लॉकडाऊन असलेले नागरिक सोमवारी थेट बाजारात उतरले. शहरातील मोठा बाजार, गांधी चौक ते बसस्थानक मार्गावरील मुख्य बाजारपेठ, राजीव गांधी चौक यासह सर्वत्र नागरिकांची गर्दी दिसत आहे. कापड, हार्डवेअर, मोबाईल, बेकरी यासह अनेक दुकाने उघडली गेली. नेमके कोणती दुकाने उघडायची परवानगी आहे याचा संभ्रम सध्यातरी कायम आहे.