करडी येथील घटना : चार लाख रुपयांचे आगीत नुकसानकरडी (पालोरा) : करडी येथील सुभाष मारोती साठवणे (५०) यांचे आज दुपारी १.३० वाजता शॉर्ट सर्किटने आग लागून संपूर्ण घर जळाले. सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. गावकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यात आली.मोहाडी तालुक्यातील सुभाष मारोती साठवणे व त्यांचा संपूर्ण परिवार रविवारी सकाळपासून शेतावर गेले असताना दुपारच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटने घराला आग लागली. धाब्यावर तणस व जनावरांचे साहित्य असल्याने आगीने रौद्र रुप धारण करीत काही अवधीत घर बेचिराख झाले. घरातील तांदूळ, उपयोगी साहित्य, धान विकून आणलेले ५० हजार रुपये, २० पोते धान, टिव्ही, सोफा, दिवाण, पंखा, दोन तोळे सोने, कवेलू फाटे व अन्य साहित्य मिळून चार लाखांचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी महसूल, पोलीस विभागाला घटनेची माहिती दिली. ठाणेदार प्रभाकर बोरकुटे यांनी एक हजार रुपयांची तत्काळ मदत दिली. मोहाडी तहसीलदार थोटे यांनी तात्काळ मदत म्हणून राशन दुकानदार टिंकू साठवणे यांना किराणा साहित्य तर श्रीराम येळणे व यशवंत गायधने आदी राशन दुकानदारांना ५० किलो गहू व तांदळाची मदत पोहचविण्याचे आदेश पटवारी मौदेकर यांना दिले.घर विझविण्यासाठी ग्रा.पं. सदस्य भाऊदास साठवणे, मुकेश असाटी, अतुल नेरकर, अनिल साठवणे, प्रवीण तुमसरे, गुलाब पंचबुद्धे, गिरीश गायधने, बंडू गिते, गजानन बिल्लोरे यांनी मदत केली. ग्रामपंचायतमार्फत सध्या राहण्यासाठी समाजमंदिर उपलब्ध करून देण्याबरोबर घरकुलासाठी शिफारस करण्याचे आश्वासन देण्यात आले. (वार्ताहर)
शॉर्ट सर्किटने घर जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2015 12:43 AM