विरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील विरली (बु.) येथे कोरोनाचा उद्रेक झाला असून शनिवारपर्यंत येथे ११६ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.तर कोरोनाने येथील ५ रुग्णांचा बळी घेतला आहे. येथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिका-यांनी हे गांव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. मात्र, हलगर्जीपणामुळे येथील आरोग्य उपकेंद्रात अँटिजेन रॅपिड टेस्ट किटचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक नागरिकांना कोरोना चाचणीविना परतावे लागले. तरीे येथे तातडीने अँटिजेन रॅपिड टेस्ट किटचा पुरवठा करावा अशी जनतेची मागणी आहे.
सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येच्या या गावात कोरोना विषाणूंचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत शनिवारपर्यंत येथे ११६ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. येथील नागरिक मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणीसाठी आरोग्य उपकेंद्रात जात आहेत. मात्र , गेल्या तीन दिवसांपासून येथील अँटिजेन रॅपिड टेस्ट किट संपल्यामुळे कोरोना चाचणीसाठी आलेल्या अनेक नागरिकांना चाचणी न करताच परतावे लागते.
ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रकोप झाला आहे. त्या गावात आरोग्य सेवेची अशी दुरावस्था असल्याने गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कोट बॉक्स
जिल्हास्तरावरच टेस्ट किटचा तुटवडा असल्यामुळे आम्हाला फारच कमी प्रमाणात टेस्ट किट मिळत आहेत. त्यातच उपविभागीय अधिका-यांनी गावस्तरावरील सर्व कँप रद्द करून केवळ लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांचीच कोरोना चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
-डाॅ. चैनराव नखाते, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरांडी (बु.)