भंडारा : संभाव्य तिसरी लाट दारावर असताना जिल्ह्यातील मंदिरे उघडावीत काय? यावर खलबते सुरू झाले आहे. यासंदर्भात राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची बोलणी केल्यावर या मुद्यावर एकमेकांकडे बोट तर दाखविलेच शिवाय मानवी आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे, असा सूरही व्यक्त करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरीचा काळ वगळता दीड वर्षांपासून मंदिरे बंदच आहेत. मंदिरात एकदम गर्दी होऊ नये व त्यामुळे कोरोना पसरवू नये, हीच या मागचे उद्दिष्ट होते. आताही तीच परिस्थिती कायम आहे. भाजपने मंदिरे उघडावीत म्हणून आंदोलने केली होती. भाजपच्यावतीने राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावी असा सूर व्यक्त केला आहे. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मते, कोरोनाला आळा घालायचा आहे. धार्मिक भावना कुणाचाही दुखावू नये याचीही काळजी घेतली जात असल्याचेही या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मंदिरे उघडावीत की नाही यासाठी राजकीय पदाधिकारी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत आहे.
लाखोंची उलाढाल ठप्प
मंदिरे उघडली नसल्याने लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे. या मंदिरावर अवलंबून असलेली शेकडो कुटुंबांची ही वाताहत होत आहे. फुल व पूजेचे साहित्य विकणाऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. पर्यायाने उलाढाल थांबल्याने संसाराचा गाडा चालवायचा तरी कसा, असा प्रश्न या कुटुंबासमोर उभा ठाकला आहे. परिणामी उलाढाल थांबल्याने संसाराचा गाडा चालवायचा तरी कसा असा प्रश्न या कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे.