वृक्ष कटाईचे प्रकरण : वरिष्ठांच्या पत्राला दाखविली केराची टोपलीप्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भंडारा उपविभागाचे अभियंता यांनी रस्त्यालगत असलेल्या वृक्षांची विनापरवानी कत्तल केली. ‘लोकमत’ने याबाबत वृत्तमालिका लावली होती. या प्रकरणाची दखल अधीक्षक अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी घेऊन कार्यकारी अभियंता यांना सात दिवसाच्या आत अहवाल मागितला होता. मात्र, आता तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही उपविभागीय अभियंता पी. पी. ठमके यांनी अहवाल दिलेला नाही. याबाबत ठमके यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून गुरूवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.कारधा ते खमारी व कारधा ते दवडीपार या मार्गावरील वृक्षांची वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या नावाखाली भंडारा उपविभागाचे उपविभागीय अभियंता पी. पी. ठमके यांनी शेकडो वृक्षांची विनापरवाना कत्तल केली. या वृक्ष कटाईदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी केली होती. याची तक्रार त्यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता व सहाय्यक अभियंता यांना केली होती. दरम्यान प्रकरणाची वृत्तमालिका ‘लोकमत’ने लावून धरली होती. याची दखल घेत अधिक्षक अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी याप्रकरणाची चौकशी करून सात दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश एप्रिल महिन्यात भंडाराचे कार्यकारी अभियंता अनिल येरकडे यांना दिले होते. मात्र, पी. पी. ठमके यांनी वरिष्ठांच्या पत्राला कचऱ्याची टोपली दाखविली आहे. तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही त्यांनी या प्रकरणाचा अहवाल किंवा त्यांचे म्हणणे बांधकाम विभागाला सादर केलेले नाही. दरम्यान भंडारा जिल्हाधिकारी यांनीही याची दखल घेऊन बांधकाम विभागाला अहवाल मागितला आहे. मात्र, सदर विभागाने किंवा ठमके यांनी याची साधी तसदी घेतलेली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणात ठमके यांना वाचविण्याचा प्रयत्न येथील अधिकारी करीत असल्याची चर्चा आता कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.वृक्ष कटाई प्रकरणाचा अहवाल दोन महिन्यापूर्वी प्राप्त व्हायला हवा होता. मात्र, ठमके यांनी तो दिलेला नाही. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून गुरूवारपर्यंत अहवाल मागितला आहे.- अनिल येरकडे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग भंडारा.
उपविभागीय अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस
By admin | Published: June 06, 2017 12:21 AM