शेतकरी कामात व्यस्त : एकाच गावात २१ हेक्टरवर रोवणी.
पालांदूर : खरीब पिकानंतर बऱ्यापैकी पाणी असणारा शेतकरी उन्हाळी धानाचा हंगाम कसतो आहे . लाखनी तालुक्यातील पालांदूर मंडळ कृषी कार्यालय अंतर्गत कनेरी येथील नरेंद्र झलके यांच्या शेतासह २१ हेक्टरवर पट्टा पद्धतीने रोवणीचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, कृषी सहाय्यक ए. बी .धांडे, कृषी व्यवस्थापक हंसराज झलके , सविता तिडके उमेेद तालुका व्यवस्थापक (उमेद पंचायत समिती लाखनी) तथा शेतकरी वर्गातून धनपाल झलके, लक्ष्मीकांत झलके, प्रदीप झलके, विकास झलके आदी शेतकरी उपस्थित होते.
पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत येणाऱ्या ५२ गावात सुमारे ११९० हेक्टरवर उन्हाळी धानाचा हंगाम नियोजित आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टाकलेल्या नर्सरीतून रोवणी चा श्रीगणेशा पालांदूर मंडळ कृषी कार्यालय अंतर्गत असलेल्या कनेरी येथे पार पाडण्यात आला. ही रोवणी पट्टा पद्धतीत दोरीच्या साह्याने सरळ रेषेत करण्यात आली. या रोवनीत सूर्यप्रकाश प्रत्येक धानाच्या बुंध्याला (झाडाला) मिळतो. पट्टा पद्धतीत २० बाय १५ सेंटीमीटर अंतरावर रोवणी केलेली आहे. १०ओळी नंतर दीड फुटाचा एक पट्टा सोडलेला आहे. यामुळे धानाचे व्यवस्थित व्यवस्थापन करण्याकरता सोयीचे होते. खताच्या मात्रा देणे, तण काढणे, कीड रोगाचे नियंत्रण ,निरीक्षण करणे, औषधी फवारणी आदी करीता पट्टा पद्धत फार मोलाची ठरलेली आहे.
वरिष्ठ भात पैदासकार डॉक्टर श्यामकुवर कृषी संशोधन केंद्र साकोली यांनी पुरविलेल्या पट्टा पद्धतीच्या सूचनांचे तंतोतंत पालन चुलबंद खोऱ्यातील शेतकरी प्रामाणिकतिने करतो आहे. पट्टा पद्धतीमुळे धान पिकाला नैसर्गिकरित्या कीड नियंत्रण करण्याकरिता मोठी मदत मिळत आहे. पारंपारिक पद्धतीला नव्या तंत्राची जोड देत आधुनिक पद्धतीने धानाची शेती केल्यास निश्चितच शेतकरी वर्गाला फायदेशीर ठरेल. असे मत मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शनात सांगितले.
डब्बा चौकट
उन्हाळी धानाचा हंगाम काळजीपूर्वक करणे नितांत गरजेचे आहे. उन्हाळी हंगामात धान पिकाला सर्वाधिक धोका खोडकिडीचा जाणवतो. तसेच खताच्या मात्रा ४० :२० :२० प्रति एकर तर १०० :५० :५० प्रति हेक्टरी मात्रा पुरवावी. झिंक सल्फेट चे सुद्धा हेक्टरी दहा किलो वापरावे. पोट्याश सुद्धा शिफारसीनुसार द्यावा. नत्राचे प्रमाण शिफारसीनुसार तीन टप्प्यात पिकांना द्यावे. गरजेपेक्षा अधिक नत्राचे प्रमाण वापरू नये. बांधानात रोवणी नंतर किमान एक ते दीड महिना अधिक पाणी भरू/ठेवू नये. अधिक पाणी बांधानात असल्यास फुटवे कमी येतात व रोगराईला आमंत्रण मिळते. तेव्हा शून्य खर्चातील नैसर्गिक उपाय योजनेकडे शेतकरी बांधवांनी विशेष लक्ष पुरवावे. नैसर्गिक उपयात गराडी चा पाला चिखलटीवर एकरी आठ ते दहा पोते घालावे. यामुळे खोडकिडीचा त्रास कमी होतो