लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यांना ‘झाडीपट्टी’ म्हणून ओळखल्या जाते. या भागात पूर्वापार काळापासून नाट्य परंपरा असून येथील लोकही नाट्यवेडे आहेत. झाडीपट्टी रंगभूमी ही हौशी रंगभूमी असली तरी या हौशी रंगभूमीचे रूपांतर व्यावसायिक रंगभूमी झाले आहे. देसाईगंज हे नाट्य कंपन्यांचे मुख्य केंद्र बनले आहे. सद्य:स्थितीत देसाईगंज येथील ५७ नाट्य कंपन्या झाडीपट्टीत रंगभूमी सजवित आहेत, हे विशेष !झाडीपट्टीतील गावागावात शंकरपट आणि मंडईचे आयोजन केले जाते. कमी लोकसंख्येचे गाव असले तरी झाडीपट्टीत बैलांचा शंकरपट किंवा मंडईचे आयोजन हमखास होत असते. सध्या बैलांच्या शंकरपटावर बंदी असली तरी मंडईच्या निमित्ताने नाटकांच्या आयोजनाची परंपरा झाडीतील लोक जोपासत आहेत .प्रख्यात नाटककार भवभुती यांचा वारसा लाभलेली नाट्य परंपरा झाडीपट्टीत असून गावोगावी अनेक नाट्य मंडळे अस्तित्वात आहेत. मराठी रंगभूमीच्या समृद्ध काळात पुण्या- मुंबईचे व्यावसायिक नाट्यमंडळे विदर्भात नाटके सादर करीत आहेत. आजघडीला झाडीपट्टीतील नाट्य कलावंतानी स्वत:ची स्वतंत्र झाडीपट्टी व्यावसायिक रंगभूमी निर्माण केली आहे.अप्रतिम सिनसिनेरी, संगीत दिग्दर्शनासाठी हार्मोनियम वादक, तबला वाजविणारे जाणकार, नायक -खलनायकाच्या भूमिका साकारणारे भारदस्त कलावंत, विनोदी भूमिका हमखास साकारणारे विनोदी कलावंत आणि झाडीपट्टी रंगभूमीचा आश्रयदाता असलेला रसिक प्रेक्षक तयार करण्यात झाडीपट्टी रंगभूमी यशस्वी झाली आहे. नाटकांना गर्दी करणाºया या झाडीपट्टी रंगभूमीने अजूनही संगीत रंगभूमी जिवंत ठेवली आहे. झाडीपट्टी रंगभूमीला समृद्ध परंपरा असून मराठी रंगभूमीच्या पडत्या काळातही झाडीपट्टी रंगभूमीने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे.हजारो हातांना मिळतो रोजगारदेसाईगंज येथे आजघडीला ५० व्यावसायिक नाट्य कंपन्या असून गावोगावी होणाºया नाटकांसाठी येथून बुकिंग केली जाते. एक नाट्य कंपनी जवळपास ४० लोकांना रोजगार देत असल्याने झाडीपट्टी रंगभूमी खºया अर्थाने रोजगाराभिमुख रंगभूमी बनली आहे. झाडीपट्टीत दरवर्षी नाटके होत असतात. अनेकांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात या रंगभूमीचा सिंहाचा वाटा आहे. साक्षरतेचे प्रमाण अल्प असलेल्या समाजातही नाटकांच्या माध्यमातून पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्य, संस्कृती व राजकीय स्थित्यंतरे आदींचे ज्ञान निरक्षर जनतेला नाटकांच्या माध्यमातून दिले जाते. वरवर पाहता नाटक मनोरंजनाचे साधन वाटत असले तरी प्रबोधनाचे मोलाचे कार्य झाडीपट्टी रंगभूमीतून होत आहे. निमित्त नाटकाचे असले तरी अनेक उपवर मुलामुलींचे विवाह या निमित्ताने घडून येण्यासाठी चालना मिळते. त्यामुळे झाडीपट्टी रंगभूमी केवळ हौस नसून ती लोकव्यवहार रंगभूमी ठरली आहे.
झाडीपट्टीतील नाट्य कंपन्या नाटकासाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:07 AM
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यांना ‘झाडीपट्टी’ म्हणून ओळखल्या जाते. या भागात पूर्वापार काळापासून नाट्य परंपरा असून येथील लोकही नाट्यवेडे आहेत.
ठळक मुद्देप्रेक्षकांमुळेच टिकून राहिली लोकसंस्कृती : हौशी रंगभूमीचे व्यावसायिक रंगभूमीत रूपांतर