देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : 'आयुष्यमान भारत' योजनेसाठी जिल्ह्यातील एक लाख ३४ हजार ४४८ कुटुंबे पात्र ठरली आहेत. त्यांच्या नोंदणीसाठी लाभार्थ्यांची एकच झुंबड उडाली आहे. जिल्ह्यात केवळ पाच केंद्रावर ही नोंदणी होत असल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. सकाळपासून आलेल्या लाभार्थ्यांची रात्री ७ वाजतापर्यत नोंदणी न झाल्यामुळे त्यांना आल्यापावली परत जावे लागत असल्याने त्यांच्यात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ मध्ये ही योजना देशभर लागू केली. सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना उपचाराकरिता या योजनेतून पाच लाखांची मदत करण्यात येते. या योजनेत एक हजार ३५० आजारांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेत ९७१ आजारांचा समावेश आहे. यातून दीड लाखापर्यंतच मदत मिळते.अलीकडेच आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थी कुटुंब आणि त्यातील सदस्यांची यादी सरकारकडून प्रसिध्द करण्यात आली असून लाभार्थ्यांना तसे पत्र प्राप्त झाले आहेत.पत्रानुसार लाभार्थ्यांना केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार लाभार्थ्यांनी जिल्ह्यात असलेल्या पाच केंद्रावर नोंदणीसाठी भेट दिली असता त्या केंद्रावर लाभार्थ्यांची एकच झुंबड उडाल्याचे दिसून आले. लाभार्थी सकाळपासून रात्री ७ वाजतापर्यंत रांगेत असूनही त्यांची नोंदणी होत नसल्याने त्यांच्यात हिरमोड होत आहे. नोंदणीदरम्यान लिंक फेलमुळे नोंदणी ठप्प होत आहे. केंद्र असलेल्या ठिकाणी कुठलीही सुविधा नसल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.अनेक केंद्रावर अरेरावी करुन आपली नोंदणी व्हावी यासाठी हमरीतुमरी होताना दिसून येते. एका केंद्रावर गर्भवती महिला भोवळ येवून पडल्याची घटना झाली आहे. काही लाभार्थी उपाशीच केंद्रावर येत असल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचेही सांगण्यात येते. जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.ग्रामपंचायत स्तरावर नोंदणीची गरजजिल्ह्यात केवळ पाच केंद्रावर आयुष्यमान भारत ही भारत सरकारची महत्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची नोंदणी होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाभार्थी असल्याने पाच केंद्रावर नोंदणी करण्यासाठी एकच गर्दी उसळत आहे. लाभार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नोंदणी प्रक्रिया ग्रामपंचायत स्तरावर घेणे आवश्यक आहे.योजनेच्या नोंदणीसाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय, तुमसर उपजिल्हा रुग्णालय या सरकारी रुग्णालयांसह मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात डॉ. भोंडेकर रुग्णालय, डॉ. नाकाडे दवाखाना, डॉ. रंगारी रुग्णालय यांचा समावेश आहे. लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी ही पाच केंद्र असली तरी सेतु केंद्राद्वारे देखील नोंदणी करता येऊ शकते. इंटरनेट बिघाडामुळे कामात व्यत्यय येत आहे. लाभार्थ्यांना गैरसोय होऊ नये त्यासाठी प्रयत्न केले जातील.- प्रमोद खंडातेशल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा
'आयुष्यमान भारत' योजनेच्या नोंदणीसाठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 9:48 PM
'आयुष्यमान भारत' योजनेसाठी जिल्ह्यातील एक लाख ३४ हजार ४४८ कुटुंबे पात्र ठरली आहेत. त्यांच्या नोंदणीसाठी लाभार्थ्यांची एकच झुंबड उडाली आहे. जिल्ह्यात केवळ पाच केंद्रावर ही नोंदणी होत असल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. सकाळपासून आलेल्या लाभार्थ्यांची रात्री ७ वाजतापर्यत नोंदणी न झाल्यामुळे त्यांना आल्यापावली परत जावे लागत असल्याने त्यांच्यात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देलाभार्थ्यांची गैरसोय : जिल्ह्यात केवळ पाच केंद्रांवर होणार एक लाख ३४ हजार कुंटुबांची नोदणी