भंडारा : हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव आज जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आकर्षक रोषणाई, ढोलताशांचा लयबद्ध गजर, देखावे आणि शोभायात्रा पाहण्यासाठी लाखोंचा उसळलेला जनसमुदाय हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते. एकंदरीत ‘श्रीराम रंगी रंगली भंडारानगरी’ असे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी दुपारी १२ वाजता श्री बहिरंगेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीरामजन्मोत्सव सोहळा पार पडला. यापूर्वी भजन, किर्तन रामजन्म कार्यक्रम, आरती व प्रसाद वितरीत करण्यात आला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सजविलेल्या आकर्षक रथातून प्रभू रामचंद्र, माता सीता व प्रभू लक्ष्मण यांच्या मूर्र्तींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध मंडळाचे देखावे, झाकी साकरण्यात आली होती.सायंकाळच्या सुमारास श्रीराम शोभायात्रा समितीच्यावतीने श्री बहिरंगेश्वर देवस्थानातून अतिथींच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी आ. अॅड. रामचंद्र अवसरे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपाध्यक्ष रूबी चढ्ढा, उद्योगपती केशवराव निर्वाण, अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष संजय कुंभलकर, नगरसेवक चंद्रशेखर रोकडे, नितीन धकाते, मंगेश वंजारी, नितीन दुरगकर, विकास मदनकर, सतीश सार्वे, सत्तार खान, संजय मते, डॉ. जगदिश निंबार्ते, रिंकु शर्मा, पंडित चेपे, यासह शेकडो भाविक उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांचा गजर वाखाणण्याजोगा होता. तरूणांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता.याशिवाय बीटीबी सब्जी भाजी असोसिएशनचे पदाधिकारी, हिंदू रक्षा मंच तथा शेतकऱ्यांच्या सहकार्याने सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मुख्य शोभायात्रेत सहभागी झाली होती. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या प्रसिद्ध श्रीराम मंदिरात उद्या बुधवारी दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात सकाळी १० वाजतापासून भजन, किर्तन, रामजन्म सोहळा व प्रसादाचे वितरण करण्यात येईल. (प्रतिनिधी)
‘श्रीराम रंगी रंगली भंडारानगरी’
By admin | Published: April 05, 2017 12:15 AM