तुमसर : शहरातील मूळ रहिवासी असलेल्या डॉ. शुभम मनगटे यांनी कोविडच्या काळात उल्लेखनीय कामगिरी करत अनेक सन्मान व पुरस्कार मिळवले आहेत. तसेच म्युकोरमायकोसिसच्या पहिल्या रुग्णाचे निदान करून नागपूर महानगरपालिकेच्या टेक्निकल कोऑर्डिनेटर मेडिकल ऑफिसर पदी निवड झाली आहे. कमी वयात वैद्यकीय क्षेत्रात गगन भरारी घेत संपूर्ण विदर्भात तुमसर शहराचे नावलौकिक केले आहे.
डॉ. शुभम नामदेवराव मनगटे यांचे प्राथमिक व हायस्कूलचे शिक्षण महर्षी विद्यालय, तुमसर येथे झाले तर ११ वी १२ वी व्हीएमबी कॉलेज, नागपूर येथून झाले. २०१७ मध्ये दादासाहेब कालमेघ दंत महाविद्यालयामधून बीडीएसची पदवी घेत २४ वर्षीय शुभमने कधीही मागे वळून पाहिलेच नाही. नागपूर येथे विविध क्लिनिकमध्ये सेवा देत आपल्या डाॅक्टरी पेशाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत शुभमने विदर्भात ५० ते ६० डेन्टल शिबिरात आपली सेवा देत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. सेवा सुरू असतानाच कोविड-१९ या महामारी संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने डॉ. शुभमने मार्च २०२० पासून नागपूर महानगरपालिकेमध्ये पाच महिने मोफत सेवा दिली. त्यातही आपल्या कार्याचा ठसा उमटविल्याने नागपूर महानगरपालिकेने त्याचे काम पाहून डॉ. शुभमकडे नागपूर जिल्ह्याचा मेडिकल टेस्टिंग इन्चार्जची जबाबदारी सोपवली. याचदरम्यान कोविडमध्ये बिईंग डेंटिस्ट फाउंडेशनमार्फत, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे येथे शुभम व त्यांच्या टिमने कार्य केले. नागपूर येथे उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. नागपूर महानगरपालिका म्युकोरमायकोसिस, टेस्टिंगचे काम पाहत असताना शुभम ला पहिला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण ऑक्टोबर २०२० मध्ये शुभमच्या हाती लागला. शुभमने आपल्या मार्गदर्शनात त्या रुग्णावर उपचार सुरू करत त्याचेवर ट्रिटमेंट सुरू केली. त्या म्युकोरमायकोसिसच्या रुग्णाला एक डोळा गमवावा लागला. जवळपास दीड करोड रुपये खर्च आला. परंतु तो रुग्ण वाचवण्यात शुभम व त्यांच्या टिमला यश आले ही उल्लेखनीय बाब आहे. तो रुग्ण आज जीवित असल्याचे समाधान आहे. तुमसरसारख्या छोट्या शहरातून नागपूरसारख्या मोठ्या शहरामध्ये आपल्या कामाचा ठसा डॉ. शुभमने उमटवला आहे.