आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा महिला रुग्णालयाकरिता आवश्यक निधीची तरतूद झाली असल्याने रुग्णालयाचे बांधकाम करण्यासाठीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी करीत अभियंत्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रक्रिया पूर्ण केली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना काळे फासू असा इशारा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला.जिल्हा महिला रुग्णालयाच्या बांधकामाकरिता अंदाजपत्रक तयार करणे, निविदा काढणे आदी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी माजी आमदार भोंडेकर यांच्या नेतृत्वात बुधवारला बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देवून कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला. भंडारा येथे स्वतंत्र जिल्हा महिला रुग्णालय मंजूर झाले असून, त्यासाठी आवश्यक तो निधी शासनाने मंजूर केला. यासाठी भोंडेकर यांनी पाठपुरावा केल्याने मागील हिवाळी अधिवेशन काळात शासनाने २५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. परंतु अनेक महिने लोटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालय बांधकामाचे अंदाजपत्रक तयार केले नाही. महिला रुग्णालयाकरिता बांधकाम विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप भोंडेकर यांनी केला. दरम्यान भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेना कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देत कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला.यावेळी त्यांनी महिला रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजपत्रक तयार करणे, निविदा प्रकाशित करणे आदी मागण्या केल्या. यावर ही प्रक्रिया १५ मार्च पर्यंत पूर्ण करण्यात येईल तसेच २५ मार्च पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता ऋषीकेश राऊत यांनी शिष्टमंडळाला दिले. महिला रुग्णालयाचे बांधकामासाठी आवश्यक ती प्रक्रिया निर्धारीत कालावधीत पूर्ण करण्यात आली नाही तर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भंडारा कार्यालयासमोर आंदोलन करीत अधिकाºयांना काळे फासण्याचा इशारा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे संजय रेहपाडे, अनिल गायधने, अॅड.रवी वाढई, यशवंत सोनकुसरे, सुरेश धुर्वे, दिनेश गजबे, नितेश मोगरे, सतीश तुरकर, मयूर लांजेवार, ललीत बोंद्रे, अख्तर बेग मिर्झा, संदीप सार्वे, राजू थोटे, ईश्वर टाले, निखील उपरीकर, श्रीकांत पंचबुद्धे शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेचा कार्यकारी अभियंत्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:30 PM
जिल्हा महिला रुग्णालयाकरिता आवश्यक निधीची तरतूद झाली असल्याने रुग्णालयाचे बांधकाम करण्यासाठीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, ....
ठळक मुद्देकाळे फासण्याचा इशारा : महिला रुग्णालय बांधकामाची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी