लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था कायम आहे, असे म्हणणे काही चुकीचे ठरणार नाही. लाखनी तालुक्यातील गुरढा ते मेंगापूर (पालांदूर)या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी डांबराचे सालटे निघाल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.माहितीनुसार, ग्रामीण रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. काही रस्त्यांची अंतर्गत स्थिती सुधारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या जोडरस्त्यांची अधिक दखल घेतली जात आहे. मात्र याबाबतीत गुरढा ते पालांदूर रस्ता तेवढा नशीबवान नाही. राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव सडक ते पोहरापर्यंतचा रस्ता अत्यंत गुळगुळीत आहे, मात्र त्यानंतर गुरढा ते मेंढापूर- पालांदूरपर्यंतचा मार्ग खडतर आहे. खरे तर या रस्त्याचे विस्तारीकरण झालेले नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता दिसून येते. आधीच रस्ता अरुंद असून, त्यातही डांबर निघाल्याने ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याला डांबराचा काही ठिकाणी मुलामा लावण्यात आल्याने तोही निघाला आहे. त्यामुळे दुचाकी घसरून अपघातही घडले आहेत. अनेकजण जखमीही झाले आहेत. मात्र या रस्त्याच्या पुनर्बांधणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसून येते. मात्र याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
वाहनधारकांची कसरत- गुरढा ते मेंगापूरपर्यंतच्या रस्त्याची अवस्था फारशी चांगली नाही. वारंवार सांगूनही सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता बांधकामाकडे दुर्लक्ष का करीत आहेत, हे एक न समजणारे कोडे आहे. वाहनधारकांचा जीव एवढा स्वस्त झाला की काय, असे आता वाटू लागले आहेत. अन्य रस्त्यांची अवस्था चांगली असताना फक्त याच रस्त्याकडे का दुर्लक्ष केले जात आहे, असाही सवाल ग्रामस्थ विचारत आहे. या मार्गाने मोठी रहदारी असताना याचे त्वरित बांधकाम होणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु तसे होताना दिसून येत नाही. एखादवेळी मोठा अपघात घडल्यावर प्रशासन जागे होणार काय, असे वाटत आहे.